मुंबई हल्ल्यांचा तपास ज्या प्रमाणे भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस करत आहेच त्याच धरतीवर अमेरिकी गुप्तचर यंत्रणाही या कामी लागल्या आहेत. या तपासात त्यांना अनेक धक्कादायक माहिती मिळत असून, मुंबईत हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्री मार्गाचा वापर केला होता हे उघड झाले आहे. एफबीआयने केलेल्या तपासात अनेक बाबी उघड झाल्या असून, केवळ पोलिसांपासून वाचण्यासाठी दहशतवादी समुद्री मार्गाने आल्याचे एफबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकी सुरक्षा मंत्रालयाचे प्रमुख अधिकारी आणि उप मंत्री चार्ल्स ई एलेन यांनी ही माहिती उघड केली आहे. सिनेतर जोसफ लिबरमन यांच्या अध्यक्षतेखालील समितीला माहिती देताना त्यांनी पाकमधील वाढत्या दहशतवादावरही चिंता व्यक्त केली आहे. |