भारताने २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात मिळालेल्या पूर्वसुचनेची माहिती आम्हाला दिली असती तर हा हल्ला नक्कीच रोखता आला असता, असे धक्कादायक विधान पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी केले आहे. त्याचबरोबर हफिझ सईदविरोधात दिलेले पुरावे पाकिस्तानी कोर्टात टिकू शकत असतील तरच त्याला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी भारताला बजावले आहे.
भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावरच इंटरपोलने सईदविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. हे पुरावे पाकिस्तान तपासून पाहिल, असेही मलिक म्हणाले. कुणाही देशाविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही, याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.