तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याच्या बातम्या येत असतानाच चीनने यासंदर्भात खुलासा केला असून, इतर देशांना काही त्रास होईल, असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
चीनमध्ये ब्रह्मपुत्रा अर्थात यारलुंग जांगबू नदीवर धरण बांधले जात आहे. भारतीय उपग्रहांनी ही गोष्ट टिपल्यानंतर त्यावरून नवा वाद उत्पन्न झाला आहे. हे धरण भारत आणि बांगलादेशासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यावर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मा जाऊक्सू यांनी सांगितले, की चीन जबाबदार देश आहे. त्यामुळे इतर देशांना काही त्रास होईल, असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही.
भारताच्या परराष्ट्र सचिव निरूपमा राव यांनी काल यासंदर्भात बोलताना, धरणाचा मुद्दा चीनशी झालेल्या चर्चेत वारंवार आम्ही उपस्थित केला. परंतु, असे कोणतेही धरण बांधत असल्याचा चीनने इन्कार केल्याचे त्या म्हणाल्या.