तिबेटी धर्मगुरू दलाई लामा अध्यात्मिक नेता असल्याने त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री मारीया ओतेरो यांनी स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांच्या अरूणाचल प्रदेश दौ-याबाबत चीनने जाहीर नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणावरून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे हे वक्तव्य महत्वाचे समजले जात आहे.
ओतेरो पत्रकारांना म्हणाले, की दलाई लामा एक धार्मिक नेते असून ते निश्चितपणे कुठल्याही देशात दौरा करू शकतात. दलाई लामा त्वांग दौ-यावर येत असून त्यास चीनचा विरोध आहे. याबाबत अमेरिकेची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की दलाई लामा मठाच्या दौ-यावर जात असून ते त्यांची जबाबदारी निभावत असल्याने त्यात अडथळा आणण्याचा प्रश्नच नाही.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा याच महिन्यात चीन दौ-यावर जाणार असून त्याच्या दौ-यात चीनी नेत्यांशी चर्चेत तिबेट हा देखिल प्रमुख मुद्दा असणार आहे.