वर्ष २०५० पर्यंत भारत अमेरिका व चीनच्या पाठोपाठ, जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असे भाकित 'कार्नेजी एन्डोव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पिस' या संस्थेने वर्तविले आहे.'द जी-२० इन २०५०' नामक एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 'जी-२०' गटातील सर्व देशांच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)मध्ये तब्बल ७० टक्के वाटा या तीन देशांचा असेल, असेही युरी दादूश व बेनेट स्टान्सिल यांनी तयार केलेल्या या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्टान्सिल हे जागतिक बँकेचे माजी संचालक आहेत, तर दादूश हे जागतिक आर्थिक कार्यक्रमाचे संचालक आहेत. वर्ष २०३२ पर्यंत अमेरिकेच्या आर्थिक विकासापेक्षा चीनचा आर्थिक विकास तब्बल २० टक्क्यांनी अधिक असेल, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
येत्या ४० वर्षांत 'जी-२०' देशांचा ६० टक्के आर्थिक विकास हा केवळ ब्राझिल, चीन, भारत, रशिया व मेक्सिको या निवडक देशांमुळे झालेला असेल.
चीन व भारताचा जीडीपी ६० ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल असा अंदाजही या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे असूनही भारताचा आर्थिक विकासदर ६.१९ टक्क्यांच्या आसपासच असेल आणि आजपासून ४०वर्षांनीदेखील 'जी-७' गटातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचे दरडोई उत्पन्न कमीच असेल.