कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंपादनसाठी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षात खरी लढत असून धर्मनिरपेक्ष जनता दलास अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
कॉंग्रेस व भाजप राज्यात स्थिर सरकार देण्याच्या आश्वासनावर सुमारे चार कोटी मतदारांना आवाहन करत आहेत. याअगोदरच्या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर चाळीस महिन्यातील अनुभव लक्षात घेता जनतेचा स्थिर सरकारच्या आश्वासनास पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
या कालावधीत धर्मनिरपेक्ष जनता दलाने त्रिशंकू परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन राज्यास वेठीवर धरले होते. निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर करेपर्यंत स्थिर सरकारची पुंगी वाजवणार्या धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एच.डी. देवेगौडांनी 'आमच्या पाठिंब्याशिवाय राज्यात सरकार स्थापने शक्य नसल्याचा घोष करायला सुरूवात केली आहे.
दोनशे चोवीस सदस्यीय विधानसभेत 58 जागा घेऊन देवेगौडांच्या जनता दलाने भाजप व कॉंग्रेसच्या पाठिंब्याने दोन कालावधीत सत्तेची चव चाखली. आताही हीच भूमिका निभावण्यासाठी ते उत्सुक आहेत.
त्यांच्या पक्षातील 58 आमदारांपैकी अर्धेअधिक आमदारांनी भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून यामध्ये एम. पी. प्रकाश, वैजनाथ पाटील, बी. आर.पाटील यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याने देवेगौडांचा पक्ष ओस पडला आहे.
|