भारतीय हॉकी महासंघाचे (आयएचएफ) सचिव ज्योतिकुमारन यांना दोन लाखांची लाच घेताना एका खाजगी टीव्ही चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे पकडण्यात आले आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
हॉकीच्या सिनीयर संघात एका खेळाडूचा समावेशकरून घेण्यासाठी त्यांना पाच लाख रूपये देण्यात आले असून त्यापैकी दोन लाख त्यांच्याकडे आणि उरलेले तीन लाख दिल्लीतील त्यांच्या एका सहकार्याकडे देण्यात आले असल्याचे चॅनेलने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर पुढील महिन्यात होणार्या अजलन शाह हॉकी स्पर्धेत त्या खेळाडूचा समावेश करण्यात येणार होता, असे वृत्त चॅनेल दिले आहे.
परंतु, हेडलाइन्स टुडेच्या या आजच्या स्टिंग ऑपरेशननंतर ज्योतिकुमारनने आयएचएफ अध्यक्ष के. पी.एस. गिल यांना फोनद्वारे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. मागील पंधरा वर्षापासून ते या पदावर कार्यरत होते.
हॉकी खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत नेहमी भ्रष्टाचार होत असून सध्याचे प्रशासन भ्रष्ट असल्याचे चॅनेलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्योतिकुमारन यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी दोन हफ्त्यात रक्कम देण्यात आल्याचा दावा चॅनेलने केला आहे.
|