शिवसेनेच्या उत्तर भारतीय भूमिकेला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या बंडखोर शिवसैनिकांनी आता राष्ट्रवादी शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानच्या निर्देशावरून प्रांतीयवादाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जयभगवान गोयल यांना राष्ट्रवादी शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून निवडले आहे. श्री. गोयल पूर्वी शिवसेनेचे उत्तर भारत प्रमुख होते. महाराष्ट्र व विशेषतः मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात हल्ले सुरूच राहिले तर आपला पक्ष गरजेनुसार कारवाई करेल, असे गोयल यांनी सांगितले.
आपल्या पक्षाच्या स्थापनेची गरज सांगताना ते म्हणाले, की ठाकरे यांची शिवसेना फक्त मराठी भाषकांसाठीच आहे. आम्हाला पूर्ण देशाला बरोबर घेऊन जायचे आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व खुद्द बाळासाहेबांनी उत्तर भारतीयांविरोधात वक्तव्य केल्यानंतर श्री. गोयल यांच्यासह शिवसेनेच्या पाच राज्यांच्या प्रमुखांनी पदांचे राजीनामे दिले होते.
दरम्यान, श्री. गोयल यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यात बाळासाहेबांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानच्या सांगण्यावरून श्री. ठाकरे देशाला अस्थिर करण्यसाठी प्रांतीयवादाला खतपाणी घालत आहेत. श्री. ठाकरे जय महाराष्ट्र अशी घोषणा करून पाकिस्तानच्या इशार्यावरून या देशाला तोडत तर नाही ना तसेच ठाकरे कुटुंब पाकिस्तानचे एजंट तर नाही ना याची चौकशी करायला हवी अशी मागणीही गोयल यांनी पत्रात केली आहे.
|