अणू करार आणि केंद्र सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून समाजवादी पक्षातच फूट पडल्याचे चित्र आहे. पक्षाचे खासदार मुनव्वर हुसेन यांच्यानंतर जयप्रकाश यांनीही फुटीचे संकेत देताना पक्षनेतृत्वावर जोरदार टीका केली.
लखनौ जिल्ह्यातील मोहनलालगंज येथून निवडून आलेले खासदार जयप्रकाश यांनी अणू करार हा जनतेच्या आणि देशाच्या विरोधात असल्याचे सांगितले. या मुद्यावरून सरकारला पाठिंबा देणार्या मुलायमसिंह यादव यांनी पक्षाला विश्वासात घेतलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला. चार वेळा खासदार झालेले जयप्रकाश पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आपण पक्षाने उचललेल्या या पावलांचा विरोध करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरूनही आपला पक्ष त्याला समर्थन देत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
समाजवादी पक्षाच्या उच्चस्तरीय समितीची आज दिल्लीत बैठक झाली. पण जयप्रकाश यात सहभागी झाले नव्हते. आपल्या मताशी सहमती असणारे अनेक खासदार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. यापूर्वी मुझफ्फरपूरचे खासदार मुनव्वर हसन यांनी अणू करार हा देश व मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून त्याला विरोध केला होता. लोकसभेत विश्वासदर्शक ठराव आल्यास पक्षाचे आठ मुस्लिम खासदार पक्षाच्या व्हिपविरोधात मतदान करतील, असेही श्री. हुसेन यांनी सांगितले होते.
|