केंद्रात कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला संकटांचा सामना करावा लागत असला तरीही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू झाले असून कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे रिक्त प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक जण देव पाण्यात बुडवून बसले असून नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा मोठा फेरबदल केला जात असल्याचे मानले जात आहे.
लवकरच मंत्रिमंडळ व महामंडळातही फेरबदलाचे संकेत यामुळे मिळाले आहेत. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी राव यांचे असलेले तणावाचे संबंध यामुळेही पक्षाने हे पाऊल उचलल्याचे मत राजकीय सूत्रांनी व्यक्त केले आहे.
तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद आहेर यांच्या जागी राजीव सातव (हिंगोली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आहेर यांच्याकडे 'आम आदमीका सिपाही' या नव्या उपक्रमाचे राष्ट्रीय समन्वयकपद देण्यात आले आहे.
|