सपुआ सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठीच्या डाव्यांच्या आततायीपणासाठी संरक्षणमंत्री ए के अँथनी यांनी डाव्यांवर राजकीय नैतिकतेचे अवमूल्यन करत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपसोबत हातमिळवणीसाठी त्यांना भविष्यात पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सपुआस हटवण्यासाठी कुणाशीही हातमिळवणी करण्याचे धोरण डाव्यांनी अवलंबले आहे.
काल-परवापर्यंत मायावतींना विरोध करणाऱ्या डावे बसपासोबत एकत्र आल्याने त्यांना राजकीय नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार नाही. माकप भूमिकेवर ठाम नसताना नैतिकतेचा आव कसा आणू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार विश्वासमत ठराव जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त करताना सपुआच्या समर्थकांना पळवण्याचे विरोधकांचे धोरण यशस्वी होणार नाही. अणुसहकार्य करार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार करण्याच्या डाव्यांच्या भूमिकेवर तोंडसुख घेताना त्यांनी संसदेत बहुसंख्य मुस्लिम खासदारांनी करारास पाठिंबा व्यक्त केल्याकडे लक्ष वेधले. अणुकरारातून ऊर्जासमस्या सोडवण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|