सोमनाथ चॅटर्जी विरोधी पक्षात असते तर त्यांना लोकसभाध्यक्षपद देण्याबाबत कॉंग्रेसने विचारही केला नसता, असे वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. भारतात लोकसभाध्यक्षांच्या बाबतीत ब्रिटनपेक्षा वेगळी स्थिती नाही.
ब्रिटनमध्ये लोकसभाध्यक्षपदी असणारी व्यक्ती पक्षाशीही निगडित राहते. चॅटर्जी यांना लोकसभाध्यक्ष भूषविण्यासाठी कॉंग्रेसने विनंती केली होती, असेही माकपने स्पष्ट केले आहे.
माकपने मे 2004 मध्ये सपुआ सरकारला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही विनंती करण्यात आली होती. माकपचे मुखपत्र 'पीपल्स डेमॉक्रसी'तील लेखात हे स्पष्ट करण्यात आले आहे. हे लक्षात घेता सोमनाथ चॅटर्जी विरोधी पक्षात असते तर त्यांना लोकसभाध्यपद देण्याबाबत कॉंग्रेसने विचारही केला नसता.
माकपने समर्थन मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चॅटर्जी पक्षाचे सदस्य असल्याने व पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आल्याने लोकसभाध्यक्षपदी कायम राहणे समर्थनीय नव्हते, असे माकपने स्पष्ट केले आहे.
ते पक्षाचे सदस्य असल्याने विश्वासमत ठरावाअगोदर राजीनामा देणे पक्षास अपेक्षित होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकसभाध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका पक्षाने घेतली होती.
लोकसभाध्यक्षपद हे पक्षीय राजकारणाहून वर असल्याने पदाची अवमानना करता कामा नेय, या कॉंग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
|