' मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाला नसता तर त्याच्या घरी कुत्राही फिरकला नसता' हे निर्लज्ज वक्तव्य आहे. केरळचे मुख्यमंत्री व्ही.एस.अच्च्युतानंदन यांचे. मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांच्या चितेचा अग्नी अजून शांतही झाला नसेल तेवढ्यात शहिदांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बलीदानाचा अपमान करण्यास निर्लज्ज राजकारण्यांनी सुरुवात केली आहे. हे कमी की काय म्हणून केरळच्या मुख्यमंत्र्यांनी शहिदाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून आपल्या वाह्यात प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. केरळचे मुख्यमंत्री अच्च्युतानंद हे मेजर संदीप उन्नीकृष्णन याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेले असता. शहीद मेजरच्या वडीलांनी 'माझा मुलगा देशासाठी शहीद झाला आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यासाठी मला कोणत्याही राजकारण्याची सहानुभूती नको. राजकारण्यांमुळेच या देशात आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे', असे सांगत त्यांना भेटण्यास नकार दिला होता. ही बाब म्हणजे आपला अपमान वाटलेल्या या मुख्यमंत्र्याने थेट शहिदांच्या कुटुंबीयांना आणि शहीद जवानाबद्दलच अपमानास्पद वक्तव्य केले. शहिदाच्या अंत्यसंस्कारानंतर तीन दिवस उलटून गेल्यानंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेलेल्या या मुख्यमंत्र्यांच्या शहिदाच्या घरी येण्यापूर्वी डॉग स्कॅडने संपूर्ण घराची तपासणी केली. अगदी उन्नीकृष्णन यांच्या स्वयंपाक घरात व देवघरातही त्यांनी डॉग स्कॅड घुसवून आपल्या सुरक्षेची खात्री करून घेतली. त्यांच्या या कृतीने देशात राजकारण्यांबद्दलच्या नाराजीत आणखी वाढ होणार आहे.दरम्यान, आपल्या वक्तव्याचा आपल्याला अजिबात खेद वाटत नसून मी माफी मागणार नाही, अशी बेफिकीर प्रतिक्रियाही नंतर मुख्यमंत्री अच्च्युतानंदन यांनी दिली आहे. अच्च्युतानंदन यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर आता कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश कारत त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे. |