लखनऊ शहरात उभारलेल्या 1500 कोटी रुपये खर्चाच्या पुतळा आणि आंबेडकर स्मारकामुळे विरोधी पक्ष आणि न्यायालयीन दबावात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत या दवावाचा सामना करण्यासाठी आक्रमक धोरण निश्चित करण्यात आले असून युपीए सरकार विरोधी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात झालेल्या या बैठकीत खासदार, आमदार, मंत्री आणि को-आर्डिनेटर्स यांच्यासह वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि कॉंग्रेस पक्षा विरोधात राष्ट्रीय पातळीवर 'लज्जा दिवस' साजरा करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. पुतळा प्रकरणी मायावती लखनऊ शहरातून एक मोठी रॅली काढण्याचीही शक्यता आहे. तत्पूर्वी गेल्या 20 जून रोजी मायावतींनी आपल्या राज्यप्रमुखांना आपापल्या ठिकाणी युपीए विरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. |