भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या अध्यक्षाचे नाव अद्याप निश्चित झालेले नसल्याचे शुक्रवारी भाजपने जाहीर केले असून आतापर्यंत याबाबत प्रसारित झालेल्या सर्व बातम्या केवळ अफवा आणि कयास असल्याचे, पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाचा पुढील अध्यक्ष निश्चित झाला असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. तर पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हे विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याचे आणि त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांची वर्णी लागल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या.
भाजपाचे माजी अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी याबाबत स्पष्ट केले आहे, की भाजपा आणि रास्वसंघ एकाच विचारधारेवर काम करणा-या स्वतंत्र संघटना आहेत. आम्ही राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर आपसात चर्चा करू शकतो. मात्र जोपर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत संघ आम्हाला तो देत नाही.