''महाराष्ट्राच्या विकासाची माझीही काही एक संकल्पना आहे. पुण्याच्या अकादमीत त्यावर कामही सुरू आहे. फक्त महाराष्ट्राची सत्ता माझी हाती द्या मग पहा महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतो मी''.... ''मराठीसंदर्भात मी घेतलेली भूमिका ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेली नाही. कळवळ्यापोटीच मी त्यावर बोलतो आहे.''....बोरीवलीच्या वसंत व्याख्यानमालेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेचा पुनरूच्चार करताना 'महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी अप्रत्यक्षपणे या मुलाखतीदरम्यान केले.
अमिताभपासून बाळासाहेब 'व्हाया' उद्धव ठाकरे या विषयांवरही राज भरभरून बोलले. या भाषणातील त्यांचे हे विचार.
अमिताभला मी कधीही 'टार्गेट' करून बोललो नव्हतो. अमिताभ मला आजही आवडतो. मात्र, त्याला सुपरस्टार पूर्ण देशाने केले आहे. महाराष्ट्रसह पूर्ण देशातील त्याच्या चाहत्यांनी त्याचे चित्रपट पैसे देऊन पाहिले आहेत. असे असताना केवळ आपल्या मातृभूमीची जाणीव ठेवून त्या राज्याच्या ब्रॅंड एम्बेसेडर तो होऊ शकतो, तर राज ठाकरे आपल्या जन्मभूमीबद्दल बोलला तर त्यात चुक काय असा सवाल मी केला होता? त्यात चुक काय होते? त्याच्यावर टीकाही काय होती? नंतर त्याने मुंबई सोडून जाणार नाही, असे सांगितले. पण मुळात त्याला मुंबई सोडून जायला सांगितले कुणी होते?
अमिताभ आणि समाजवादी पक्षाचे मुळात संबंधच वेगळे आहेत. त्यांच्या पत्नी त्या पक्षाच्या खासदार आहेत. जया बच्चन आपल्याला ओळखत नाहीत. ते बरेच झाले. नाही तर आमच्याविरोधात बोलला म्हणून त्यांचा फोन आला असता.
मुंबईचे विद्रुपीकरण करण्यात मुंबई महापालिकेतील मराठी अधिकार्यांचाही हात आहे. काही पैशांसाठी हे लोक झोपड्यांना परवानगी देतात किंवा दुर्लक्ष करतात. मग या झोपड्या वाढतात आणि असे प्रश्न निर्माण होतात.
हाणामार्या किंवा हिंसाचार करण्यासाठी मी पक्ष काढलेला नाही. पण काही करण्याआधी साफसफाई करावी लागते. एखादी मूर्ती घडविण्यासाठी आधी त्याचा नको असलेला भाग काढून टाकावा लागतोय. सध्या मी तेच करतोय.
डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रभाषा हिंदी व एकूणच मुंबईसंदर्भात जे लिहिले तेच शिवाजी पार्कमधील सभेत वाचून दाखविले. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी असे कुठले पुस्तकच नसल्याचे म्हटले. यामुळे एक तर असे काही पुस्तक आहे, याची माहितीच त्यांना नसावी किंवा त्यांचे वाचन कमी असावे. कारण या पुस्तकाचे प्रकाशक खुद्द प्रकाश यांचे वडिल यशवंतराव आंबेडकर आहेत. हे पुस्तक शोधण्यासाठी अनेक लायब्रर्या पालथ्या घातल्या. पण ते मिळत नव्हते. ते शोधण्यासाठी काय केले ते आम्हाला माहित. आणि मुळात माझ्या भूमिकेच्या समर्थनार्थ एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी कोणाच्या नावाला हात घालतोय. ते मला कळत नाही का? त्यासाठी पुरेशी काळजी मी घेणार नाही का? या राज्यातला दलित समाज हा मुळात मराठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मबिर्म वगैरे त्यानंतर येतो. पण त्यांच्या मतांवर राजकारण करणारे नेते अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये करतात.
भय्यांविरोधातील आंदोलनानंतर आता लोक बिनधास्तपणे टॅक्सीत बसताना, भाजी विकत घेताना मराठीत बोलतात, असे आता ऐकू येऊ लागले आहे. त्यामुळे घडले ते चांगलेच घडले. पण हा प्रश्न मुळात १९३२ साली माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रथम मांडला होता. त्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्र समिती, आचार्य अत्रे नंतर बाळासाहेबांनीही माडंला. त्यानंतर आज चाळीस वर्षांनी मीही मांडतो आहे. म्हणजे या पूर्ण काळात आम्ही काहीच शिकलो नाही का?
जागतिकीकरणाच्या लाटेत इंग्रजी शिकलीच पाहिजे. पण म्हणून मराठी सोडायची असा त्याचा अर्थ नाही.
महाराष्ट्रातील तरूण कामसू आहेत. महाराष्ट्रात माणसे मिळत नाही म्हणून आपल्या गोठ्यातही बिहारी लोकच दूध काढतात, हे शरद पवारांचे विधान चुकीचे आहेत. मुळात आज इतकी वर्षे आपल्या माता भगिनी हेच काम करत होत्या ना? मग माणसे मिळत नाहीत, या म्हणण्याला काय अर्थ आहे?
बाळासाहेबांशी माझा आजही संपर्क आहे. त्यांच्याशी फोन होतात. पण जे काही बोलणे असते, ते पूर्णपणे राजकारणापलीकडचे असते. राजकारणात आघाडी कुणाशी करण्याचा सध्या तरी प्रश्नच येत नाही. कारण निवडणुका दूर आहेत. मुळात राष्ट्रवादीने 'मनसे'शी आघाडी करण्याचा नकार दिलाय. भाजपनेही तेच म्हटलंय. कॉंग्रेसबाबत मला काही वाटत नाही. आणि 'आमच्या' त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असेल तर मग युती कुणाशी करण्याचा प्रश्नच येत नाही. (मिश्किल हसत हसत) कदाचित निवडणुकीत आम्हालाच बहूमत मिळेल आणि कुणाची गरजही भासणार नाही.
या देशात यापुढे आघाड्यांचेच राजकारण चालेल. कारण प्रांतीय प्रश्न तेच चांगले मांडू शकतात. आता महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर राष्ट्रीय पश्र असलेले कॉंग्रेस आणि भाजप काय भूमिका घेणार? ती मांडण्यासाठी प्रादेशिक पक्षच हवा.
वडापावविक्रेत्यांची संघटना बांधून त्यांना कॉर्पोरेट कल्चरमध्ये आणलं जात असेल तर चांगलं आहे. मुळात महापालिकेने त्यांना तिथेच अधिकृत जागा दिली पाहिजे. त्यांना जागा दिल्याने रस्त्यात काही अडथळे येणार नाहीत. मुळात आता अडथळ्यातून मार्ग काढतच इथला माणूस जातो आहे ना?
|