विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागपूर पदवीधर मतदार संघातील जागा नितीन गडकरींनी कायम राखली असून पुण्यात 24 वर्षांनंतर भाजपने इतिहास घडवीत पदवीधर व शिक्षक मदार संघाच्या दोन्ही जागा जिंकल्या आहेत.
नागपूर
नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपला गड राखण्यात यश मिळविले आहे. गडकरी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बबनराव तायवाडे यांचा 23,925 मतांनी पराभव केला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच गडकरी आघाडीवर होते. त्यांनी अखेरपर्यंत आघाडी कायम राखत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भरघोस मतांनी विजय मिळविला आहे.
पुणे
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत 24 वर्षांची परंपरा मोडीत काढत भाजपच्या चंद्रकांत पाटील व भगवान साळुंखे इतिहास घडविला आहे. पदवीधर मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे. एकूण १ लाख २७ हजार मतांपैकी पाटील यांना पहिल्या पसंतीची 44,584 मते मिळाली. यांनी राष्ट्रवादीचे राजेश पाटील, कॉग्रेसचे माणिक पाटील-चुयेकर, मूळचे राष्ट्रवादीचे मात्र बंडखोर अपक्ष उमेदवार माधवराव पाटील आणि लोकभारतीच्या मनीषा पाटील यांचा पराभव केला आहे.
तर शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही भगवान साळुंखे यांनी विद्यमान आमदार गजेंद्र ऐनापुरे व रयत शिक्षण संस्था पुरस्कृत उमेदवार प्रा. मोहन राजमाने यांचा ३९८६ मतांनी पराभव केला.
औरंगाबाद
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी उशीरापर्यंत सुरू होती त्यात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले असून भाजपचे श्रीकांत जोशी, शिवसनेचे राजीव वैद्य, कॉग्रेसचे जगन्नाथ पाटील तर विठ्ठल मोरे यांना पराभव पत्करावा लागला आहे.
अमरावती
अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे गाजली असून या निवडणुकीत विद्यमान आमदार वसंतराव खोटरे आघाडीवर आहेत. तर शिक्षक आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनीही त्यांना कडवी झुंज दिली आहे.
|