महाराष्ट्रात गेली 40 वर्षे मटका साम्राज्यावर अधिराज्य गाजवणारे सारेच मटका किंग पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने राज्यात सुमारे अर्ध्या शतकानंतर सट्ट्याचा आकडा 'ओपन' अन 'क्लोज' झाला नाही. गेल्या दोन आठवड्यापासून संपूर्ण राज्यात सटटा बंद आहे. महाराष्ट्रातील बंद असलेल्या मटका बाजाराला पुन्हा सुरू करण्यासाठी आता मध्यप्रदेशातील काही बुकी प्रयत्न करीत असून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या 'मटका' बाजारातील मंडळींशी हे बुकी काही दिवसांपासून संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
मटका किंग सुरेश भगत याची अलिबागजवळ झालेली हत्या व त्यानंतर त्याची पत्नी जया आणि मुलाला झालेली अटक तसेच पप्पू सावला, शाह असे सारेच मटका किंग पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने 'सटटा' बाजाराचे कंबरडेच मोडले. गेल्या अर्धशतकभर महाराष्ट्रातील अगदी ग्रामीण व अतिदुर्गम भागापर्यंत पोचलेला हा मटका बाजार प्रथमच बंद पडला. मटका बाजाराची मक्तदारी असणारे सारेच रथी-महारथी आज गजाआड आहेत.
मटका बाजारातील गॉडफादर म्हणून ओळखला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीही आज तुरुंगात आहे. संपूर्ण देशात जोमाने चालणारा राज्यातील राज्यातील मटका बाजार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मध्यप्रदेशातील काही बुकी प्रयत्न करीत असून त्यांना दिल्लीतील काही बड्या बुकींनी मदत करण्याची तयारी दाखविल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. हे बुकी मुंबईतील काही माफियांच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्यभर मटका बाजारात गुंतलेल्या मंडळींशी संपर्क साधत आहेत.
मटका बाजार हा पोलिसांच्या सह कार्याशिवाय चालणे अशक्यच. त्यामुळेच पोलिसांना भली मोठी आमिष देऊन परिस्थिती मुंबई पोलीस कितपत आपली प्रामाणिकपणा टिकवून ठेवते यावर पुन्हा एकदा या 'मटका' बाजाराचे भविष्य अवलंबून आहे.
|