लोकसभा निवडणुकीचे पडघम हळूहळू वाजू लागले आहेत आणि इच्छुकांच्या आकांक्षांनाही धुमारे फुटू लागले आहेत. या इच्छुकांमध्येही नव्या पिढीचे नवे शिलेदारही आहेत. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या नव्या शिलेदारांपैकीच एक आहेत. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मतदानासाठी प्रोत्साहित करणारी पूनम यांची छबी असलेली मोठमोठी पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टर्समधून पूनम यांची निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची इच्छाच जाहीर होत असल्याचे म्हटले जातेय.
दक्षिण मुंबई या मतदारसंघातून त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्यांची ही मोर्चेबांधणी सुरू असल्याचा कयास बांधला जात आहे. या मतदारसंघातून जयवंतीबेन मेहता निवडणुक लढवत असत. गेल्या निवडणुकीत त्या कॉंग्रेसचे तरूण तुर्क उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून पराभूत झाल्या. आता देवरांना आव्हान देण्यासाठी पूनम पुढे सरसावल्या आहेत.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम यांनी पक्षात रितसर प्रवेश करून कामाला सुरवात केली. सध्या त्या भाजयुमोच्या सरचिटणीस आहेत. त्यांचे मामा गोपीनाथ मुंडे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दिवंगत महाजन यांच्या पत्नी रेखा यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुंडे त्यावेळी सक्रीय होते. पण पक्षाने प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मुंडे नाराज झाले होते. आता पूनम यांच्या निमित्ताने ते पुन्हा आपली ताकद आजमावणार आहेत.
सध्या तरी पूनम यांनी आपण मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी ही जाहिरात मोहिम असल्याचे म्हटले आहे. पण पक्ष त्यांना तिकीट देईल काय हे काळच ठरवेल. |