तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर शहर विकासाचा १९६२ कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासन शिफारशीसह केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. तसेच, शहराच्या विकासासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भातही राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शनिवारी दिली.
कोल्हापूर येथे शहर विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेने फोर्टेस कंपनीकडून हा आराखडा तयार करुन घेतला आहे. या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यावेळी महापौर उदय साळोखे, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, अपारंपरिक ऊर्जा मंत्री विनय कोरे, शालेय शिक्षण राज्यमंत्री हसन मुश्रीफ, दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार सदाशिवराव मंडलिक, जिल्हाधिकारी दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
कोल्हापूरला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाभरातून भाविक येत असतात. छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते, असे नमूद करुन मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, कोल्हापूर शहर विकासाच्या आराखड्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल व आपल्या शिफारशींसह हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवेल.
कोल्हापूर शहर विकासाचा आराखडा महापौर उदय साळोखे यांनी सर्वांच्यावतीने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना प्रदान केला. प्रतापसिंह जाधव यांनी तिरुपती देवस्थानप्रमाणेच महालक्ष्मी मंदिराचा विकास व्हावा असे सांगून कोल्हापूर शहर स्थापनेला २ हजार वर्षे झाली आहेत. शहर विकासाच्या आराखड्यास राज्य शासनाने सहकार्य करावे, असे सांगितले.
असा आहे प्रस्तावित आराखडा:- कोल्हापूर शहर विकास आराखड्यात रस्ते विकासासाठी ४२ कोटी, रिंगरोडसाठी १५० कोटी, विविध विकास कामांच्या भूसंपादनासाठी १५० कोटी, पाणी पुरवठा योजनासाठी ४१४ कोटी, विमानतळासाठी भूसंपादन १६५ कोटी, रंकाळा तलाव सुशोभिकरण ४१ कोटी, खासबाग मैदानासाठी ५ कोटी, कोटीतीर्थ तलाव १३ कोटी तसेच कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणासाठी ७ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च सुचविण्यात आला आहे.
|