मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > दर्पणकारांच्या जन्मभूमीत....
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दर्पणकारांच्या जन्मभूमीत....
WDWD
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे म्हणजे नररत्नांची खाण. साहित्य, संगीत, कला, नाटक, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण अशा अनेक क्षेत्राला या परिसराने हिरे-माणके बहाल केली. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे असेच एक दिग्गज व्यक्तिमत्व कोकणच्या याच लाल मातीत जन्माला आले. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या रूपाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहुर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जन्मले तेव्हाच्या रत्नागिरी इलाख्यातील (आताचा सिंधुदुर्ग जिल्हा) देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावात.

शाळेच्या अभ्यासात बाळशास्त्रींचा आणि त्यांच्या कार्याचा ओझरता परिचय झाला. नंतर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आणि प्रत्यक्ष पत्रकारितेत कार्यरत असताना बाळशास्त्री सावलीसारखे सोबत राहिले. माझाही जन्म, बालपण आणि शिक्षण सिंधुदुर्गात झालेले. त्यामुळे त्यांच्याविषयी विशेष असा सार्थ अभिमानही मनात होताच. पण एकदा महाविद्यालयीन जीवनात आचार्य अत्रे यांचे मराठी माणसे - मराठी मने या पुस्तकातील बाळशास्त्री यांच्यावरील लेख वाचनात आला. आचार्य अत्रे यांनी त्यांच्याविषयी असे म्हटले आहे की, बिकट काळात सर्व परिस्थितीचा धैर्याने आणि आपल्या दृष्टीने विचार करून समाजाला जागृत करणारा आणि मार्ग दाखविणारा एक बुद्धिमान पुरुष जन्माला आला, त्याचे नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर. आपले राज्य का गेले आणि इंग्रजांचे राज्य या देशात का आले, याचे अचूक निदान करणारा महाराष्ट्रातील हा पहिला पुरुष होय. . . . . बाळशास्त्री केवळ आद्य पत्रकारच नव्हे तर ते स्त्री शिक्षण, समाज सुधारणा, राजकीय जागृती या क्षेत्रातही त्यांनी आद्य म्हणावे लागेल अशा स्वरुपाचे मुलभूत कार्य केले. अव्वल इंग्रजी अमदानीच्या काळात बाळशास्त्रींनी आपल्या अल्पशा (१८१२-१८४६) आयुष्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नव्या विचारांचा पाया घातला. हे आणि अशाच प्रकारचे अनेक पैलू त्यांचा अभ्यास करतांना लक्षात आले आणि एकदा तरी या महापुरुषाच्या जन्मगावाचे दर्शन घ्यावे आणि तेथील पायधूळ मस्तकी लावावी असा पणच केला आणि पोंभुर्ल्याच्या दिशेने कूच केली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाजन करणार्‍या खारेपाटण खाडीच्या दक्षिण किनार्‍यावर पोंभुर्ले हे अत्यंत निसर्गरम्य गाव वसले आहे. सावंतवाडीहून मी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला म्हणजे खारेपाटणला पोचलो. तिथून साधारण १५ कि. मी. वर पोंभुर्ले आहे असे कळले. हे गाव आजही एवढे दुर्गम आहे की, १८२५ साली बाळशास्त्री येथून मुंबईला कसे पोहचले असतील हे कोडे आजही सुटत नाही. या गावाला सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच गाड्या सुटत. सकाळची गाडी मला चुकली, त्यामुळे पदयात्रा करत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. खारेपाटणच्या बाजारात तहानलाडू-भूकलाडू अशी शिदोरी घेऊन लाल मातीच्या रस्ता तुडवीत पोंभुर्ल्याकडे निघालो. हिरवी गर्द वनश्री, लाल मातीचा नागमोडी रस्ता, बाजुने संथ वाहणारी निळीशार खारेपाटणची खाडी, कुठलीच घाई नसलेल्या हळूवार चालणार्‍या शिडाच्या होड्या अशा रम्य वातावरणात माझा प्रवास चालू होता. वाटेत कोर्ले-धालवली हे टुमदार गाव लागले. लक्षात आले की, हे तर विंदा करंदीकरांचे गाव. तिथल्या झापाच्या हॉटेलात बसून गरम चहा घेतला. गावकर्‍यांबरोबर विंदांची चौकशी केली. त्यांनीही विंदांच्या आठवणी आपलेपणाने सांगितल्या. अजून पोंभुर्ले पाच-सहा कि. मी. आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे जास्त न रमता मी पुढे निघालो.

छोट्या-मोठ्या घाट्या चढत-उतरत अखेर एकदाचा पोंभुर्ल्याच्या शाळेजवळ पोचलो. तिथे चौकशी केली बाळशास्त्री यांचे घर कोठे आहे. माहिती मिळाली की, शास्त्रीबुवांचे घर उभे नाही, फक्त चौथरा आहे. त्यांचे कांही वंशज इथे राहतात. आता किमान चौथर्‍याचे तरी दर्शन घ्यावे म्हणून तो कोठे आहे याची चौकशी केली. एका बुजुर्ग गावकर्‍याने समोरच्या एका उभ्या घाटीकडे बोट दाखवित तेथे जावे लागेल असे सांगितले. घाटी चढण्यावाचून पर्याय नव्हता. दमछाक करणारी आणि अस्सल कोकणी हिसका दाखविणारी घाटी चढून मी माथ्यावर आलो. तिथे सुधाकर जांभेकर भेटले. त्यांना येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यांना अप्रूप वाटल्याचे दिसले. मोठ्या अपुर्बाईने त्यांनी आगत-स्वागत करुन बाळशास्त्री जांभेकरांच्या घराच्या चौथर्‍यावर नेले.

किमान दोनशे पावसाळे पाहिलेल्या त्या चौथर्‍याला नमस्कार करुन मी त्यावर उभा राहिलो आणि बाळशास्त्रींचा अल्प परंतु तेजस्वी जीवनपट माझ्या डोळ्यासमोरुन झरकन तरळून गेला. १८१२ साली इथे जन्मलेले बाळशास्त्री १८२५ मध्ये मुंबईत पोचले. व्युत्पन्न ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या बाळशात्र्यांनी निसर्गदत्त बुध्दीचातुर्याच्या जोरावर एवढी मुसंडी मारली की, १८३० साली इंग्रज सरकारने त्यांची शिक्षण खात्याचे डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली. पुढच्या दोन वर्षांनी त्यांना नेटिव्ह सेक्रेटरी हे मानाचे पद मिळाले. आतापर्यंत हे पद फक्त युरोपियन, पार्शी वगैरेंनाच मिळत असे. हे पद मिळविणारे ते पहिले महाराष्ट्रीय ठरले.

ज्ञानप्रसार आणि समाजसुधारणा यासाठी लोकशिक्षण आणि त्यासाठी वृत्तपत्राची मदत असे सूत्र त्यांनी मनाशी बांधले आणि ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित केला. मुंबईत त्या आधी पारशी मंडळींनी मुंबईना समाचार हे वृत्तपत्र काढले होते, ते बर्‍यापैकी चालतही होते. पण मराठी माणसाने हे धाडस करण्याची ही पहिलीच वेळ होती. दर्पणचा पहिला अंक काढण्यापूर्वी त्यांनी १२ नोव्हेंबर १८३१ रोजी प्रॉस्पेक्टस् किंवा प्रस्ताव या नावाने वृत्तपत्र काढण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात ते म्हणतात, ‘स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृध्दी व येथील लोकांचे कल्याण या विषयी स्वतंत्रतेने व उघड रितीने विचार करावयास स्थल व्हावे यासाठी हे वृत्तपत्र आम्ही काढीत आहोत. मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने कळीवणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची दर्पण छापणारांस मोठी उत्कंठा आहे, म्हणोन या गोष्टी साध्य होण्यासाठी जितका प्रयत्न करावेत तितका ते करितील. कोण एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोषांचा मळ दर्पणास लागणार नाही. कारण की, दर्पण छापणारांचे लक्ष्य निष्कृत्रीम आहे. म्हणोन हे वर्तमानपत्र ज्यारितीने भले आणि गुणी पुरुषांस मान्य होईल त्यारितीने करण्यास ते दृढनिश्चयाने उद्योग करितील.’

बाळशास्त्री जांभेकरांनी ही भूमिका दर्पणाच्या पहिल्या अंकापासून ते अगदी १ जुलै १८४० रोजी शेवटचा अंक प्रसिध्द करेपर्यंत मोठ्या नेटाने निभावली.

स्त्री शिक्षण हाच समाज सुधारणेचा खरा पाया आहे हे त्यांनी ओळखले होते. तथापि कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेल्या त्यावेळच्या हिंदू समाजात स्त्री शिक्षण किंवा पुनर्विवाह यासारख्या विषयांवर बोलणेही धर्मभ्रष्टतेचे लक्षण मानले जाई. अशा परिस्थितीत शास्त्रीबुवांनी आपल्या एका निबंधात..... तस्मात स्त्रियांनी विद्याभ्यास न करावा, हे शुध्द अज्ञान आहे. यास शास्त्रीय किंवा लौकिक आधार कांही नाही. यास्तव सर्वांनी आपापल्या मुलींकरवी विद्याभ्यास करावा, असा आमचा मनोरथ आहे. आमचे मते पुरुषांपेक्षा स्त्रियांस व्यापार करण्याची बुध्दी सहा पट अधिक आहे.

स्त्रियांना समान हक्क असावेत यासाठी त्यांनी मोहीम उघडली. रुक्मिणी व स्त्री शिक्षण, मुलींची मुंज का नाही ? अशा निबंधांतून त्यांनी स्त्रियांनाही शिक्षण आणि वेदविद्येचा अधिकार आहे असे सांगून एकच खळबळ उडवून दिली. पुरुषांप्रमाणेच स्त्री समाजाचा एक प्रमुख घटक आहे. स्त्रीमुळेच समाज वृध्दींगत होतो. पुरुषांप्रमाणे त्यांनाही मन, विचार करण्याची शक्ती आहे. यास्तव मुलींचे शिक्षणही महत्वाचे आहे असे आग्रही मत त्यांनी मांडले. त्यांचे द्रष्टेपण असे की ज्या काळात सर्वसामान्य पुरुषांनाही शिक्षण मिळत नव्हते त्या काळात त्यांनी स्त्री-पुरुष समानता आणि जात-धर्म असे भेद न मानता सर्वच स्त्रियांना शिक्षण मिळावे अशी भूमिका मांडली.

राजमान्यता आणि लोकमान्यता ही दोन विशेष अभिधाने एकाचवेळी प्राप्त होण्याचे भाग्य फारच थोड्यांना लाभते. बाळशात्र्यांनी हे सगळे स्वकर्तृत्व, विलक्षण कुशाग्र बुध्दीमत्ता यांच्या जोरावर मिळविले. इंग्रजी, संस्कृत, लॉटिन, फ्रेंच, फारसी, उर्दू, गुजराथी, बंगाली, कानडी अशा अनेक भाषा त्यांना येत होत्या. विविध विषयांवरचे निबंध लिहून आधुनिक मराठी गद्याचे जनकत्व त्यांनी घेतले. मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. गणितांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. शून्यलब्धि आणि मूलपरिणती गणित यासारख्या मूलभूत पुस्तकांची रचनाही त्यांनी केली. जस्टीस ऑफ पिस ही अत्यंत सन्मानाची उपाधी देऊन इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांचा यथोचित गौरव केला. पश्चिम भारतातील आधुनिक ऋषी अशी पदवी प्राप्त करणार्‍या बाळशात्र्यांवर नियतीने मात्र त्यांना अल्पायुष्य देवून अन्यायच केला. किरकोळ तापाचे निमित्त होऊन वयाच्या अवघ्या ३४-३५ व्या वर्षी त्यांनी इहलोकाची यात्रा संपविली. भर्तृहरिने विधात्याचा हा खेळ नेमकेपणाने मांडला आहे. त्याच्या मूळ संस्कृत श्लोकाचे वामन पंडितांनी केलेले चपखल रुपांतर माझ्या जीभेवर अभावितपणे आले.

जें पात्र कीं पुरुषरत्न महागुणांचे, तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचे
की त्यांसही त्वरित मृत्यूमुखांत लोटी, त्याची गमे मज अपंडितता करंटी

मराठी वृत्तपत्र सृष्टीचाच नव्हे तर स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मुलन, अशा अनेक क्षेत्रात सुधारणांचा पाया रचणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पडक्या घराच्या उद्ध्वस्त चौथर्‍यावर मी पुन्हा एकदा नतमस्तक झालो आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

या चौथर्‍याच्या ठिकाणी आता महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभारलेले बाळशास्त्री जांभेकरांचे सुंदर स्मारक उभे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारानेच नव्हे तर प्रत्येकाने महाराष्ट्राच्या या पत्रपंढरीची एकदा तरी वारी करावी. राज्य शासनाने आता स्मारक स्थळापर्यंत रस्त्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

सतीश लळीत

 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
राणे कॉंग्रेसमध्‍येच राहणार, आज सोनियांशी भेट
राज्‍यमंत्रिमंडळाच्‍या विस्‍ताराची शक्‍यता
पुण्यात 20 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी
करकरेंच्‍या बलिदानाचा आम्‍हाला गर्वः कविता करकरे
समृध्‍दीसाठी मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
वर्षभरात चौपदरी रस्त्यांचे जाळे- उपमुख्‍यमंत्री