नांदेड येथे महसूल विभाग स्थापन करण्याच्या मान्यतेसोबतच सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत झालेले निर्णय असे- नागपूर येथील विद्यमान रेशिमबाग खेळाच्या मैदानातील उत्तर-पूर्वेकडील नागपूर महानगरपालिकेचे लोककर्म विभागाचे स्टोअर व वापरात नसलेल्या जलतरण तलावाची जागा वगळून कम्युनिटी सेंटर करीता आरक्षण करण्यास आज मान्यता देण्यात आली. याठिकाणी सुप्रसिद्ध गझलकार व ज्येष्ठ कवी सुरेश भट ऑडिटोरियम बांधण्याचे प्रस्तावित असून नागपूर महानगरपालिकेने याकरिता अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
अपंग कल्याण विभागाच्या नवीन योजनांना मान्यता
अपंगांच्या अशासकीय विशेष शाळा व कर्मशाळांमधील कर्मचारी अपंग विद्यार्थ्यांना तसेच अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांना पुढील नवीन योजना व सवलती लागू करण्यास मान्यता देण्यात आली. |