प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या आठव्या टप्प्यातील २१२८ कोटींच्या प्रस्तावाला लवकरच अंतिम मान्यता मिळून राज्यातील ४६०० किलोमीटरचे ग्रामीण रस्ते पक्क्या रस्त्याने जोडल्या जातील. अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
मोहिते-पाटील यांनी सोमवारी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून राज्याच्या ग्रामीण विकासाबाबत चर्चा केली. त्यावेळी श्रीमती पाटील यांनी पुढील बैठकीत आठव्या टप्प्यातील प्रस्तावाला अंतिम मंजूरी देण्यास सहमती दर्शविली. या योजनेंतर्गत टप्पा एक ते सात पर्यंतच्या कामात राज्याने यशस्वी प्रगती केली आहे.
चालू वर्षात ९०० कोटींच्या ग्रामीण रस्त्यांचे उदिष्ट राज्याने ठेवले आहे. यासाठी केंद्राकडून ५०० कोटी रूपये राज्याला मिळाले. तर राज्याने डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष ५२५ कोटी रूपये रस्त्यावर खर्च केले, असल्याची बाब मंत्रीमहोदयांनी निदर्शनास आणून दिली. वर्षाअखेर पर्यंत रस्त्यांच्या कामावर हजार कोटी खर्च करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. |