मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू झाले त्यास आज पावणे दोनशे वर्षे उलटली आहेत. मराठी पत्रकारितेचा प्रवाह बराच रूंद झाला आहे. आता पत्रकारितेच्या छापील आणि दृकश्राव्य माध्यमांचा संयोग असलेली ऑनलाईन पत्रकारिता आगामी काळ व्यापून टाकणार आहे. मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांच्या गर्दीतही ही पत्रकारिता वेगळे स्थान निर्माण करू पहात आहे. आलम दुनियेची खबरबात त्वरेने देण्याबरोबरच त्याच त्वरेने तिचे विश्लेषण करणारी आणि त्याचबरोबर वाचकांनाही आपले मत तितक्याच गतीने आणि स्वतंत्रपणे अविष्कृत करू देणारी ही नव्या युगाची पत्रकारिता आहे.
मुद्रित माध्यमातील निर्भिड, निष्पक्ष पत्रकारितेचा वारसा आणि दृक श्राव्य पत्रकारितेतील सडेतोडपणा ही वैशिष्ट्ये या माध्यमानेही जपलेली आहेत. मुख्य म्हणजे आभासी जगात वावरत असूनही या दुनियेने मातीशी नाळ तोडलेली नाही. उलट वास्तवाला कवटाळून त्यावर भर देणारी ही पत्रकारिता आहे.
आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या वृत्तपत्राच्या रूपाने सुरू केलेली परंपरा आता आपले स्वरूप अधिक व्यापक करीत ऑनलाईन वृत्तपत्राच्या रूपाने आपले स्थान पक्के करू लागली आहे. या परंपरेची पताका मराठी. वेबदुनिया.कॉम या वेबसाईटने आपल्या खांद्यावर घेतली आहे. इंटरनेटवर 'ग्लोबल' वावरतानाही या वेबसाईटने मराठी मातीचा 'लोकल' गंध या दुनियेतही दरवळत ठेवला आहे. अनेक विषय समर्थपणे हाताळून निर्भिड पत्रकारितेचा वसा 'ऑनलाईन'ही कायम ठेवला आहे. ऑनलाईन पत्रकारितेच्या या ताकदीविषयी आणि तिच्या भविष्यातील वाटचालीविषयी आज पत्रकारदिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक मान्यवरांना बोलते केले. त्यांच्याशी झालेली चर्चा, त्यांच्याच शब्दांत...
ऑनलाईन पत्रकारिता नवे क्षितिज - विजय बाविस्कर (संपादक, लोकमत - पुणे) जगभर आयटी क्षेत्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढत चालल्याने ऑनलाईन पत्रकारितेचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक होणार आहे. भारतीय पत्रकारितेला पत्रकारांच्या अनेक पिढ्यांनी समृध्द वारसा दिला आहे. त्यांच्या संस्कारांचे हे बाळकडू नव्याने उदयास येणा-या वेब पत्रकारितेसाठीही महत्वाचे ठरत आहे. सुरूवातीला केवळ इंग्रजीमध्ये असलेली महाजालाची दुनिया आता तंत्रज्ञानाच्या विकासासोबत प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध झाल्याने प्रादेशिक भाषांमधील ऑनलाईन वृत्तपत्रे वाचकांना अधिक जवळची वाटू लागली आहेत. येथे वाचकांनाही आपली मते लाइव्ह व्यक्त करता येत असल्याने त्यास अधिक महत्व आहे.
मराठी भाषेने पत्रकारितेला नेहमीच नवे आयाम मिळवून दिले आहेत. आता हा वारसा ऑनलाईन वृत्तपत्रांच्या माध्यमातून अधिक बळकट आहे. www.marathi.webdunia.com ने हाच वारसा पुढे चालवून मराठीतील ऑनलाईन वृत्तपत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जबाबदारी आणि विश्वासार्हतेच्या बळावर चाललेली ही पत्रकारिता वृत्तवाहिन्यांच्या 'सबसे तेज'च्या नादात केवळ मुद्रीत माध्यमांपुरतीच मर्यादीत राहते की काय असे वाटत असताना वृत्तपत्रांची नीतिमत्ता आणि वाहिन्यांची वेगवानता टीकवून ठेवत ऑनलाईन वृत्तपत्रे नवी क्षितीजे पादाक्रांत करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला उज्वल भवितव्य आहे यात शंकाच नाही.
वेबपत्रकारिता काळाची गरज - किरण ठाकूर (संपादक,'तरूण भारत' बेळगांव) इलेक्ट्रॉनिक युग असल्याने आजकाल मोबाईलवर काढलेले छायाचित्र जगभरात पोहोचवता येऊ शकते त्याप्रमाणे वेबसाईरूवरून देण्यात आलेली माहिती एकाचवेळी जगभरात मिळू शकते. म्हणूनच 'वेब पत्रकारिता'ही माध्यमाची बदलती संकल्पना भविष्यात महत्वाची ठरणार आहे.
स्वातंत्र्यलढ्यावेळी वृत्तपत्रांनी मोलाची कामगिरी बजावली. टिळक,आगरकर,महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर आदीं दिग्गज मंडळींनी देशहितासाठी प्रेरीत होऊन पत्रकारिता केली. त्याकाळातील अशा ध्येयवादी पत्रकारांनी या लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. पण,त्यानंतरच्या काळात निष्ठा काहीशी कमी झाली आणि माध्यमांनाही बाजारूपणा येऊ लागला. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये माध्यमे 'कमर्शिअल' होत आहेत. माध्यमांच्या दृष्टीने सध्याचा काळ आव्हानात्मक ठरत आहे. अशा काळात पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जनकल्याण हे पत्रकारितेचे प्रमुख तत्व आहे. म्हणून याच ध्येयवादाने आणि निर्भिडपणे पत्रकारिता केली गेली पाहिजे. यासाठी ध्येयवादी पत्रकारांची फौज तयार होण्याची गरज आहे.
ग्लोबल युगामध्ये माध्यमांच्याही संकल्पना बदलत आहेत. इलेक्ट्रानिक माध्यमांची संख्या आणि गरज वाढते आहे. त्याचबरोबर जगभरात माहिती पोहोचविणारी वेब पत्रकारिताही काळाची गरज ठरत आहे. माध्यमांमुळे जगभरात अतिजलद माहिती पोहोचत असली तरी या माध्यमांतील पत्रकारांनी सकारात्मक आणि तत्वनिष्ठ पत्रकारिता झाली पाहिजे.अर्थात आपण जनतेसाठी हे व्रत स्विकारले आहे,याचे भान राखले गेले पाहिजे. पहिले मराठी पोर्टल असणा-या 'वेबदुनिया'ने हेच व्रत अविरतपणे सुरू ठेवले आहे,याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन...
ऑनलाइन पत्रकारिता काळाची गरजच! विद्याधर पानट (ज्येष्ठ पत्रकार, जळगाव)
बातमी ही कुठल्याही माध्यामातली असो ती जनमानसात आविष्कार घडवणारी असते. ऑनलाइन पत्रकारितेमुळे जग अधिकच जवळ आले आहे. माहिती कुठल्याही स्वरूपाची असो ती नागरिकांपर्यंत तत्काळ पोहचवली पाहिजे तसेच ती खेळती ठेवली पाहिजे. त्यावरच ऑनलाइन पत्रकारितेचे यश आहे. मराठी वेबदुनिया डॉट कॉमही मराठीतील एकमेव अशी मराठी बातम्यांची साइट आहे. त्यावर नेहमी बातम्या अपडेट वाचावयास मिळतात.
ग्लोबल व लोकल यांना साधणारा सेतू - जगदिश मोरे (सहाय्यक माहिती संचालक) इंटरनेट हे मुद्रीत व दृकश्राव्य माध्यमाचे एकत्रीकरण आहे. वृतपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पलीकडे जाऊन या माध्यमातील माहितीचे मुल्य फार मोठे आहे. मुख्य म्हणजे संगणकाच्या पडद्यावरच काम करत असताना या जगाला आपण भेट देऊ शकतो. त्याचवेळी त्याचे संदर्भमुल्य फार मोठे आहे. त्यामुळे आज वेळ नाही मिळाला तरी उद्याही आपण या जगात प्रवेश केला तरी ते शिळे वाटत नाही. म्हणूनच हे जग नेहमीच ताजे वाटणारे आहे. त्याचे उपयोगमुल्यही बरेच आहे. म्हणूनच आजच्या जगात सर्च या शब्दाला मोठे महत्त्व आले आहे. वेबदुनियाने एरवी इंग्रजीत असणारे हे जग मराठीत आणून मोठे काम केले आहे. मराठी मातीचा गंध जागतिक पातळीवर पोहोचविला आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला क्षणोक्षणी मराठी मातीत काय घडते याची माहिती मिळू शकते. ऑनलाईन पत्रकारितेचा हा अध्याय पुढे आणखी वृद्धिंगत होणार हे स्पष्ट दिसते आहे. वेबदुनियाच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा.
वृंदा भार्गवे (पत्रकारिता विभाग प्रमुख नाशिक) येणारा काळ हा तरुणांचा आहे. सध्या प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत प्रिंट मिडियाला तोड नाही, परंतु देशाबाहेरील वाचक आणि भारतीयांसाठी केवळ वेबमिडियाच एकमेव आधार म्हणावा लागेल.
या माध्यमातून आपण कोणत्याही वृत्ताची दखल त्वरित घेऊ शकतो ही याची खासियत आहे, तसेच या माध्यमावर लोकांच्या प्रतिक्रियाही आपल्याला पाहायला मिळतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे माध्यम सध्या काळाची गरज बनत चालले असून, येणा-या काळात जगाशी संपर्क साधण्यासाठी हा महत्वाचा दुवा आहे.
ऑनलाइन पत्रकारितेचे महत्त्व भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळे पत्रकारितेत करियर करणार्यांना मोठी संधी उबलब्ध होरार आहे. मराठी वेबदुनियाच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...! |