मुंबईत शिवाजी पार्कवर रविवार 11 जानेवारी ते मंगळवार 13 जानेवारी 2009 या तीन दिवसात प्रतिकोल्हापूर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशात राहणार्या कोल्हापूरवासीय कुटुंबांचा हा स्नेहमेळावा आहे. या महोत्सवाचा प्रारंभ रविवार 11 जानेवारी 2009 रोजी संध्याकाळी 5.00 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राज्य विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे अपारंपारिक ऊर्जा व फलोद्यान मंत्री श्री. विनय कोरे यानी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई महानगर प्रदेशात येऊन स्थायिक झालेल्या आणि स्थायिक होण्याचा प्रयत्न करणार्या नागरिकांसाठी या महानगरामध्ये 'कोल्हापूर भवन' उभारण्याचा संकल्प श्री. कोरे व त्यांच्या मित्रमंडळींनी केलेला आहे. यासाठी न्यासरुपाने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून तिचे स्वरूप व अन्य बाबी या संबंधात श्री. कोरे या कार्यक्रमावेळी घोषणा करणार आहेत.मुंबई महानगरात येऊन स्थायिक झालेल्या व होण्याचा प्रयत्न करणार्या कोल्हापूरकरांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे जीवन सुकर बनावे यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन 'कोल्हापूर भवन' कडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाजी पार्कवरील या महोत्सवासाठी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वास्तुशिल्पांच्या प्रतिकृती भव्य व देखण्या स्वरूपात उभारल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादन होणार्या विविध वस्तू व पदार्थ यांचे प्रदर्शन हासुद्धा या सोहळ्याचा एक भाग राहणार आहे. तसेच या जिल्ह्यातील पारंपारिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा..... |