महाराष्ट्र हाऊसिंग एंड डेव्हलपमेंट सोसायटीच्या (म्हाडा) घरांचे वाटप मुंबईत सुरू होणार असून यातील 80 टक्के घरे मराठी माणसांनाच दिली गेली पाहिजेत, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. पक्षाच्या 'सामना' या मुखपत्रातून लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले आहे, की नोक-यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के प्रधान्य दिले जावे ही सेनेची भूमिका आहे. सरकारने त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. आता म्हाडातील घरांमध्येही 80 टक्के घरे मराठी माणसासाठी राखीव ठेवले पाहीजेत. म्हाडाच्या लॉटरी सिस्टममध्ये मराठी माणसांना नेहमीच नुकसान सोसावे लागल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
दरम्यान म्हाडाच्या 42 ठिकाणांवर तयार झालेल्या सुमारे साडे तीन हजारपेक्षाही अधिक घरांसाठी सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून त्यासाठी मुंबईकर पहाटे पाच वाजेपासून एचडीएफसी बँकेच्या बाहेर रांगा लावून आहेत. |