नागपूर- दिवसा गरमी आणि रात्री उशिरा थंडी असे सध्याचे वातावरण असल्याने राज्यात विजेची मागणी वाढली असून मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या ११२०० मे.वॅ.विजेचे उत्पादन आहे. आणि मागणी १५००० मे.वॅ.पर्यंत पोहोचली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत सुमारे ३,८०० मेगावॅट इतकी आहे. पण महानिर्मिती मात्र १३२२० मे.वॉ. उत्पादन असल्याचा दावा करीत आहे. थर्मल पॉवर स्टेशनचे उत्पादन ६८०० मे. वॅ. ऐवजी ४७५५ मे. वॅ. आहे. महाजेनकोचे उत्पादन ९५६० मे.वॅ. आहे. विजेची उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या कोट्यातून ३ हजार मे.वॅ. वीज महावितरण घेत आहे. पण ती कमी पडत असल्यामुळे एक हजार मे.वॅ. जास्तीची वीज केंद्राच्या कोट्यातून घ्यावी लागणार आहे. ही वीज जास्त दिवस घेणे शक्य होणार नसल्यामुळेच भारनियमनात वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तसेच थंडीतही वाढ झाली नसल्यामुळे वातावरणातील उष्णता कायम आहे. परिणामी वीज वापरात वाढ झाली आहे. थंडी नसल्यामुळे कृषी पंपधारकांनाही विहिरीवरील पाण्यासाठी वीज वापरावी लागत असून या आठवड्यात कृषी पंपासाठीही वीज वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली. परिणामी भारनियमन वाढण्याची शक्यता आहे.