दरोडा प्रकरणात संशयित म्हणून अटक झालेल्या पोचन्ना भिमा दांडेकर असे नाव असलेल्या दरोडेखोराने पोलिसांना चकवा देऊन पळ काढल्यानंतर त्याच्या शोधात दोन दिशेने गेलेल्या दोन्ही पोलिस पथकांच्या हातात पोचन्ना लागला. एकूणच दोन्ही पथके पोचन्नाला घेऊनच नागपुरात परतली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हा संशयित आरोपी गिट्टीखदान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रात्री उशिरापर्यंत अशी घटनाच घडली नसल्याचे सांगून पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे पाठविण्यात आली होती. पोचन्ना दांडेकर नावाच्या दरोडेखोरांला अटक करण्याचे आदेश दोन्ही पथकांना देण्यात आले होते. दोन्ही पथकाने आपापल्या पद्धतीने पोचन्नाचा शोध चालविला. आश्चर्य म्हणजे दोन्ही पथकाच्या हाती पोचन्ना लागला. दरोडेखोर मिळाल्याच्या आनंदात एक पथक पोचन्ना उर्फ पोचमन्नु मधू दांडेकरला घेऊन रविवारी रात्री गिट्टीखदान ठाण्यात पोहचले.
पोचन्ना ऊर्फ पोचमन्नुची विचारपूस सुरू असतानाच पोलिसांचे दुसरे पथक पोचन्ना भिमा दांडेकर नावाच्या दरोडेखोराला घेऊन ठाण्यात दाखल झाले. दोन्ही पथकांनी दरोडेखोर आपल्याच हाती लागल्याचा दावा करण्यास सुरुवात केल्याने ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला. एकच आरोपी दोन पथकांच्या हाती कसा लागला, या प्रश्नाने सर्वांना गोंधळात टाकले. यातील एक पोचन्ना मात्र संधीचा फायदा घेऊन पळून गेला, हे विशेष !