मुख्य पृष्ठ » धर्म » सण-उत्सव » नवरात्रौत्सव » काळेश्वरी उर्फ काळूबाई
 
काळेश्वरी
PR
PR
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथे श्री काळेश्वरी देवी उर्फ काळूबाईचे पुरातन मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळूबाईची नवरात्रात यात्रा असते. देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करत असतात. समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान पर्यटकांना आकर्षित करत असते.

वाईपासून अवघ्या वीस किमी अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी वाई व भोरमार्गे जाता येते.

नवरात्रौत्सवाशिवाय शाकंबरी पौणिर्मेला काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जात असते. यात्रेला महाराष्‍ट्रसह देशभरातून भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. देवीच्या जागराने सारा परिसर दुमदुमुन जातो.

नैसर्गिक सौंदर्याची खाण असलेल्या मांढरदेव येथे पर्यटकांची ही गर्दी होत असते. वाईहून मांढरदेवकडे जाताना घाटातून पांडव गड, माळवा पठार, कृष्णा नदीवरील धोम धरण दृष्टीस पडते. पावसाळ्यात हिरवेगार गालिचे व डोंगरावरून फेसाळणारे धबधबे तर मनाला आनंद देतात. नवरात्री सणानिमित्त मंदिर विद्युत रोषणाईत न्हाऊन निघते. मंदिर ट्रस्टच्या वतीने अखंड नंदादीप योजने सुरू केली आहे. देवीच्या गाभार्‍यात अखंड नंदादीप लावले जातात.

काळूबाईचे मंदीर हे पूर्वाभिमूख असून दर्शनीभागात दोन दीपमाळा आहेत. दगडी सभामंडप असून गाभार्‍या ही स्वयंभू काळेश्वरीची मूर्ती आहे. सिंह हे देवीचे वाहन आहे. डोक्यावर चांदीचा मुगुट आणि गळ्यात सोन्याचे लखलखणारे दागिने आहेत. पूर्वी देवीला कोंबडी, बकर्‍याचा नैवेद्यासह पुरणावरणाचा नैवेद्य दाखविला जात होता. मात्र 2005 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या अपघातानंतर येथील जुन्या प्रथा बंद करण्‍यात आल्या आहेत. मांढरदेवीला कालिका, काळूबाई, काळूआई, काळेश्वरी अशा विविध नावांनी ओळखले जाते.
संबंधित माहिती शोधा