गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १॥
गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनि कल्लोळ उठीला । कड्यासी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २॥
तुशार उठती रेणु । दुसरे रज मातले । वात मिश्रीत ते रेणु । सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी । निबीड दाटली छाया । त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥
गर्जती स्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे । गडद होतसे रात्री । ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥
कर्दमु निवदेना तो । मनासी साकडे पडे । विशाळ लोटली धारा । ती खाली रम्य विवरे ॥ ६॥
कपाटे नेटक्या गुंफा । तापसी राहती सदा । नेमस्त बांधली नाना । उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे । कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ८॥
|