एकमुखी रुद्राक्ष भुक्तिमुक्ती देणारा आहे. तो साक्षात् शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात. जेथे त्याचे पूजन होत असेल तेथून लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कोठलाही उपद्रव होत नाही. दोन मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात. हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे. तीन मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात. यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते. चार मुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे यामुळे धनदौलतीची वाढ होते पाचमुखी रुद्राक्ष खुद्द रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. याच्यामुळे पापवृद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्तिमार्गाकडे वळतो. सहा मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेशस्वरूपही आहे व तो उजव्या हाता बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो. सात मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणार्याला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने सहा मातृक, सात अश्व व सात ऋषी प्रसन्न होतात. हा यश व कीर्ती देतो. आठ मुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरवरूप आहे. हा धारण करणार्याला भरपूर आयुष्य लाभते नऊ मुखी रुद्राक्ष कपिलमुनी आहे आणि त्याची अधिष्ठाची देवता दुर्गा माहेश्वरी आहे, हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काही लोक याला स्वरूपही मानतात. दशमुख रुद्राक्ष स्वत: जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात. हा अंगावर धारण केल्याने पिशाच्य, ब्रह्मराक्षस, सर्प इत्यादींचे भय नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो. अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. याची मुख्य देवता इंद्र आहे. याचे पूजनाने अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते. बारामुखाचा रुद्राक्ष धारण करणारा आदित्यासमान आहे. हा विष्णूरूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाहीसे होते. तेरामुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वेदेवासमान आहे. आणि त्याच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व दारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो. चौदामुखी रुद्राक्ष परम शिवरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते. यास हनुमानाचे स्वरूपाची मानतात.
रुद्राक्ष शेंडीत एक, डोक्यात चाळीस, गळ्यात बत्तीस, प्रत्येक वाहूत सोळा, कानात एक एक, हातात बारा आणि एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी. असे शिवपुराणात सांगितले आहे. त्याचप्रमाणे शिवपुराणात रुद्राक्षाची कथा सांगितली आहे, ती अशी :- पूर्वी एक हजार दिव्य वर्षे तप केल्यामुळे श्री शंकराचे मन क्षुधित झाले होते. त्याने सहज लीलेने डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले. त्या अश्रुबिंदूचेच रुद्राक्षाचे वृक्ष झाले. प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले. नंतर ते दुसरीकडे परसले. म्हणून परम पावन रुद्राक्ष श्रीशंकरला अतिशय प्रिय आहे. एखादे वेळेस रुद्राक्ष किडतात किंवा तडकतात, तेव्हा ते काढून टाकून नवीन धारण करतात.
साभार : संपूर्ण चातुर्मास पुस्तकातून घेतलेले.
|