मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > हिंदू धर्माविषयी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वारीतलं अध्यात्म  Search similar articles
सौ. भाग्यश्री कुलकर्णी

vari
MH GOVT
आषाढधारा चांगल्या बरसू लागल्या की टाळ मृदुंगांचे स्वर कानी पडू लागतात. ग्यानबा तुकारामचा जयघोष घुमू लागतो. बेभानपणे धरतीवर बरसणारा पाऊस आणि टाळ मृदुंगाच्या आवाजात स्वत:ला विसरून विठूनामाच्या गजरात अतिशय तल्लीनतेने नाचणारा तो वारकरी यांच्यात एकच लय आहे असे जाणवते.

कपाळाला गोपीचंदनाचा टिळा त्यावर गंध बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ. कपडे भलेही फाटके असतील, पण चेहर्‍यावरून भक्तीरसाचे ऐश्वर्य ओसंडून वाहतंय. वारकर्‍यांचे हे वाह्यरूप.

या काळात आपल्या माऊलीला भेटायला एखादे बालक जेवढे आतुर असते, त्याच आतुरतेने तो झपाझप पावले उचलत पंढरीकडे जात असतो.

विठ्ठलाच्या भेटण्याची आस लागलेला तो, त्याच्या नामात इतका गुंगून जातो की चालण्यातले श्रम, वारा, पाऊस चिखल या कशाचाही त्याला त्रास होत नाही. या निसर्गाचाच तो एक भाग होतो अन् आनंदात गात नाचत तो विठूरायाच्या दर्शनाला निघतो. त्याच्यासोबत असणारी त्याची धरधनीण डोक्यावर तुळशी-वृंदावन घेऊन कपाळावर मोठ्या पैशाएवढा आकाराचे कुंकू, बुक्का, गळ्यात माळ अन् हिरवं पंढरपुरी लुगडं नेसून निघालेली असते. जणू काही चंद्रभागेला भेटायला चाललेली एखादी माहेरवाशीणच.

vari
MH GOVT
या दोघांना बरोबर बघताना मला तर त्यांच्या दर्शनातच विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद मिळतो. डोक्यावर मुंडासे, गळ्यात उपरणे, धोतर अशा वेशातला सावळा विठ्ठल, रखुमाईसमवेत दर्शन द्यायला आला आहे असे वाटते. मनात जरी ते चित्र उभे राहीले तरी कंठ आनंदाने दाटून येतो.

विठोबा आपला का वाटत असावा? इतर देवांपेक्षा त्याच्यात आणि आपल्यात भेद नाही असे का वाटते? त्याच्याजवळ गेलं की मनावरचं ओझं का उतरतं? याची उत्तरं वारीतली कुणी देईल किंवा देऊ शकेल ? सांगता येणार नाही. पण या सावळ्याजवळ कुठलाही भेदभाव नाही जात, धर्म, पंथ, वंश सारे भेद वारीत सामील झाले की मिटतात. आपल्या गावातून निघणार्‍या वारीतला प्रत्येक माणुस पुढे एकत्रित वारीला जाऊन शेवटी विठ्ठलाच्या विटेपर्यंत जाऊन पोहोचतो. वाटेत गावकरी देत असलेले जेवण सगळे मिळून जेवतात खाली बसतात. पत्रावळीवर जेवतात. त्या एका घासाची चव पंचपंक्वानांनाही येणार नाही.
1 | 2  >>  
आणखी
सद्गुरूला शरण:
असे करावे शनिवारचे व्रत
डोळे मन आणि जीवन
सत्कर्म आणि सद्‍भाव
वैदिक धर्माचे त्रातेः आदी शंकराचार्य
पैसा आणि प्रेम