मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस सटीचें नवरात्र असते. पहिल्या दिवशी खंडोबाची स्थपना करून त्याची पूजा करतात. सहा दिवस अखंड नंदादीप लावतात. पहिल्या दिवशीं फुलांची एक माळ दुसर्या दिवशी दोन असे क्रमाने वाढवीत जाऊन सहाव्या दिवशी सहा माळा घालतात. रोज सकाळी व संध्याकळी पूजा करून आरती करतात. चंपाषष्ठीच्या दिवशी तळी आरती करतात. तबकांतला नारळ खंडोबावरून ओवाळून फोडतात. व त्याचा प्रसाद व भंडारा सर्वांना देतात. त्या दिवशी भरीत रोडग्याच्या व कांद्याच्या पातीचा नैवेद्य असतो. या दिवशीं खंडोबापुढें गोंधळ घालतात.
| शंकराने आपली दाढी आपटून त्यातील एक केस उपटला. या केसातून त्याने एका महिला दैत्याची निर्मिती केली. तिचे नाव घृतांबरी |
| |
चंपाषष्ठीमागे एक पौराणिक कथा आहे. त्यावेळी मणी व मल्ल या दोन राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. ऋषी-मुनी त्यांच्या त्रासामुळे हैराण झाले होते. राक्षसांची सेना बांधून या दोघांनी यज्ञात विघ्न आण, आश्रमाची तोडफोड कर, ऋषींना पळवून लाव असले उद्योग सुरू केले. त्रासलेले ऋषी, मुनी विष्णूकडे गेले. विष्णूने सांगितले या दोन्ही राक्षसांचे पारिपत्य करणे माझ्या हातात नाही, पण मी शिवाकडे तुमच्यासाठी साकडे घालतो. विष्णूने शिवाला झालेला प्रकार सांगितला आणि धर्माच्या अंमलबजावणीसाठी या दोन राक्षसांचे पारिपत्य करणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. शिवाने मग या राक्षसांचा निर्दालन करण्याचे मान्य केले. त्यानंतर शंकराने आपली दाढी आपटून त्यातील एक केस उपटला. या केसातून त्याने एका महिला दैत्याची निर्मिती केली. तिचे नाव घृतांबरी. शंकराने तिला मणी व मल्लाच्या पारिपत्याची जबाबदारी सोपवली. या युद्धात तिने शंकराला खूप मदत केली. गणपतीने या सैन्याचे नेतृत्व केले.
याचसंदर्भात आणखी ऐक पौराणिक कथा आहे. मणी व मल्लाच्या निर्दालनासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले. पार्वती शक्ती झाली आणि तिचे नाव म्हाळसा पडले. चंद्राने शिवासाठी शुभ्र घोड्याचे रूप घेतले. शंकराच्या हातात त्रिशूळ, डमरू आणि खंड होता. प्रतिपदेच्या दिवशी भैरवाने मणीशी युद्ध आरंभ केले. सलग सहा दिवस न थांबता हे यु्द्ध चालले. साक्षात शिवाच्या हल्ल्यापुढे मणी काय टिकणार. तो जखमी झाला आणि बेशुद्धावस्थेत खाली पडला. जाग आल्यानंतर त्याला आपले न्यूनत्व जाणवले आणि तो शंकराच्या पायावर कोसळला. आपल्यावर दया करावी अशी विनंती त्याने शंकराला केली. तसेच आपल्या नित्य पायाखाली मला राहू द्यावे अशी प्रार्थना केली. शंकराने ही प्रार्थना मान्य केली. त्यानंतर मणीने प्राण सोडला. पण त्याचा भाऊ मल्लाचा ताठा मात्र कायम होता. त्याने युद्ध सुरूच ठेवले. शंकराने त्यालाही दाती तृण धरायला लावले. अखेरीस त्यानेही भावाप्रमाणेच शंकराच्या पायाशी लोळण घेऊन दयेची भिक मागितली. शंकराने त्यालाही अभय दिले. मल्लानेही नंतर प्राण सोडले. पण त्याच्या मृत्यूने संतापलेले त्याचे पाच पुत्र कुंभ, सुशिल, देवगंधर्व, लोहर्गल आणि महाबाहू यांनी शंकराशी युद्ध सुरू केले. हे युद्ध सहाव्या दिवशी संपले. त्यादिवशी मार्गशीर्षाचा निम्मा महिना होता. त्यालाच चंपाषष्ठी असे म्हटले जाऊ लागले.
मणीच्या विनंतीनुसार शंकराने तो नेहमी आपल्याजवळ राहिल असे वचन दिले आणि त्याचा भाऊ मल्लाला मोक्ष दिला. त्याचप्रमाणे शंकराने मल्लाचे नाव आपल्याला घेतले. म्हणून तो मल्लानी नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे हेच नाव मल्हारी असे रूढ झाले.
खंडोबाची जेजुरी पुण्याजवळ ६५ किलोमीटरवर जेजुरीला खंडोबाचे मंदिर आहे. हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेकांचे कुलदैवत आहे. हे मुख्यतः धनगर लोकांचे भक्तीस्थान आहे. जेजुरीजवळ असणारे होळ गाव हे इंदूरच्या होळकर घराण्याचे मूळ गाव आहे. या घराण्याचे कुलदैवतही मल्हारी मार्तंडच आहे. खंडोबाचे मंदिर गडावर असून साधारण दोनशे पायऱ्या आहेत. शिवाजी महाराजही पूर्वी खंडोबाच्या दर्शनाला येत असे पुरावे आहेत. खंडोबालाच मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत असे म्हणतात. खंडोबाला दोन बायका आहेत. एक म्हाळसा व दुसरी बाणाई. खंडोबाला वाहून दिलेल्या भक्तांना वाघ्या असे म्हणताता. खंडोबाच्या जयजयकारासाठी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करतात. कानडीत येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी म्हणजे मल्हारी मार्तंडाचा सात कोटी वेळा जयजयकार. त्याचवेळी खंडोबाचे सात कोटी सैन्य होते, असाही एक संदर्भ आहे. भंडारा आणि खोबरे उधळून खंडोबाची पूजा केली जाते.
|