शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (12:50 IST)

भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

दुसऱ्या फेरीत रामकुमार रामनाथनचे आव्हान संपुष्टात
 
एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी भारताच्या लिएंडर पेस व मेक्सिकोच्या मिगुल एग्नेल रियास या जोडीचा 6-7(4), 6-4, 17-15 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या रोहन बोपन्ना याने दिवीज शरणच्या साथीत भारताच्या लिएंडर पेस व मेक्सिकोच्या मिगुल एग्नेल रियास या जोडीचा 6-7(4), 6-4, 17-15 असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1 तास 45 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये भारताच्या लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास या जोडीने रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(4)असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने जोरदार कमबॅक करत लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांची तिसऱ्या, तर लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांनी रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. त्यानंतर रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांची पुन्हा सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली.सुपरटायब्रेकमध्ये संघर्षपूर्ण लढतीत रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी आक्रमक व चतुराईने खेळ करत लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास या जोडीवर 17-15 असा जिंकून विजय मिळवला.
 
एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 1 तास 45मिनिटे चाललेल्या या सामन्यात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या लातवियाच्या जागतिक क्र.95असलेल्या एर्नेस्ट गुलबीसचा 7-6(5), 7-6(5)असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. बेलारूसच्या स्टीव्ह दार्सिस याने ट्युनेशियाच्या चौथ्या मानांकित मालेक झजेरी याचा 7-5, 6-2असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1तास 33मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये स्टीव्ह दार्सिसने झजेरीची दुसऱ्या, चौथ्या व बाराव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील स्टीव्ह दार्सिसने झजेरीची सहाव्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2असा जिंकून विजय मिळवला. उपांत्य फेरीत स्टीव्ह दार्सिस याचा सामना इवो कार्लोविच याच्याशी होणार आहे.
 
काल रात्री झालेल्या एकेरीच्या लढतीत दुसऱ्या फेरीत ट्युनेशियाच्या चौथ्या मानांकित मलेक झजेरी याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या रामकुमार रामनाथनचा 6-7(6), 7-6(5), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2तास 46मिनिटे चालला. दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीने भारताच्या एन श्रीराम बालाजी व अर्जुन कढे या जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-1असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: एकेरी गट:
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि.एर्नेस्ट गुलबीस(लातविया)7-6(5), 7-6(5);
स्टीव्ह दार्सिस(बेलारूस)वि.वि.मालेक झजेरी(ट्युनेशिया)(4) 7-5, 6-2;
 
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन) वि.वि.एन श्रीराम बालाजी(भारत)/अर्जुन कढे(भारत)7-6(5), 6-1;
सिमॉन बोलेल्ली(इटली)/इवान दोडीज(क्रोएशिया)वि.वि.केविन क्रविटज(जर्मनी)/आंद्रेस मिइस(जर्मनी) 6-2, 6-4;
गेरार्ड ग्रनॉलर्स(स्पेन)/मार्सेल ग्रनॉलर्स(स्पेन)वि.वि.डेनिस मोलचाव/इगोर झेलेनी(स्लोव्हाकिया)6-4, 6-7(3), 10-6.
रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)वि.वि. लिएंडर पेस(भारत)/मिगुल एग्नेल रियास(मेक्सिको)6-7(4), 6-4, 17-15.