ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटींगचा धूर्तपणा किती आहे, हे हरभजनप्रकरणावरून दिसून आले आहे. भज्जीला पत्ता कट करण्यासाठी त्याने असे काही डावपेच लढविले की दोन्ही कसोटीत चार डावात त्याला तीन वेळा बाद करणार्या हरभजनला पुढच्या तीन कसोटीत त्याने संघाबाहेर बसविले आहे.
ऑस्ट्रेलियात कोणताही संघ गेला की तो जिंकून येत नाही. याचे कारण ऑस्ट्रेलिया त्या संघाला हरविण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर करते. मैदानातील खेळ हा एक मार्ग असला तरी दुसर्या देशाचा संघ ऑस्ट्रेलियात येईपर्यंत मिडीयाद्वारे त्या संघाचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करतात. शिवाय स्लेजिंग अर्थात शेरेबाजी करून पाहुण्यांना जेरीस आणतात. आणि यात कमी पडले की मैदानात जाऊन पाहुण्या खेळाडूंवर कॉमेंट करतात. त्यामुळे जम बसलेल्या खेळाडूचे संतुलन ढळते आणि तो बाद होतो. स्टीव्ह वॉ या सगळ्यात माहिर होता. आता त्याची गादी पॉंटींग पुढे चालवतो आहे.
हरभजनच्या बाबतीतही असेच झाले. हरभजन सायमंड्सला बिक मंकी म्हणाला अशी तक्रार पॉंटींगने केली. हरभजनचे हे विधान वर्णद्वेषी मानले गेले आणि आयसीसीच्या नियम ३३ अंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. वास्तविक घटना घडली तेव्हा हरभजन फलंदाजी करत होता. दुसर्या बाजूला सचिन तेंडूलकर होता.
या तक्रारीची सुनावणी झाली तेव्हा या घटनेची कोणतेही व्हीडीओ फुटेज दाखविण्यात आले नाही. कोणतीही टेप ऐकविण्यात आली नाही. पंचांनीही आम्ही काहीही ऐकले नाही असे सांगितले. तरीही केवळ सायमंड्स आणि पॉंटींगने म्हटले म्हणून हरभजनवर कारवाईचा निर्णय घेतला गेला.
कारवाईसाठी मायकल क्लार्क आणि हेडन यांच्या साक्षीचा आधार घेतला गेला. वास्तविक सचिन तेंडूलकर दुसर्या बाजूला होता. पण त्याला मात्र साक्ष द्यायला नकार देण्यात आला. याचा अर्थ सरळ सरळ हे हरभजनविरूद्ध करण्यात आलेले कारस्थान होते. त्यामुळेच आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने कडक पवित्रा घेतला पाहिजे. आयसीसी चालते ती बीसीसीआयच्या जीवावर. कारण सर्वांत जास्त क्रिकेट भारतात पाहिले जाते. त्यामुळे सर्वांत जास्त पैसाही येथूनच मिळतो. त्यामुळे आता बीसीसीआयने आयसीसीशी भांडायलाच पाहिजे.
भले हा दौरा रद्द झाला तरी चालेल, पण आयसीसी किंवा ऑस्ट्रेलिया यांना आम्ही घाबरत नाही हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. हरभजनविरूद्धची कारवाई मागे घ्यावी व दोन्ही पंचांवर वादग्रस्त निर्णय दिल्याबद्दल कारवाई व्हावी ही मागणी आता बीसीसीआयने रेटून धरली पाहिजे.
सायमंड्सला बिग मंकी म्हणण्यासंदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मंकी म्हणजे माकड हा शब्द काही कोण्या जातीसंदर्भात नाही. त्यामुळे वर्णद्वेषाशी त्याचा काहाही संबंध नाही. आई बापही अनेकदा म्हणतात,की काय माकडासारखा उड्या मारतोय याचा अर्थ ते त्याला वर्णद्वेषी शेरेबाजी करतात?
हरभजनला लक्ष्य करण्याचाच हा प्रकार आहे. पॉंटीगला तीन वेळा या मालिकेत हरभजननेच बाद केले आहे. याशिवाय भारतात भज्जीनेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना यापूर्वी भांगडा करायला लावला आहे. त्यामुळेच त्याला काढण्यासाठी हे पद्धतशीर कारस्थान केले जात आहे.
|