दशकभरापासून भारतीय फलंदाजीस बळकटी देणार्या राहुल द्रविडने दहा हजार कसोटी धावांचा पल्ला गाठून 'भिंत' हे बिरूद सार्थ ठरवले आहे. या भीमपराक्रमासोबत दस हजारी सरदारांच्या पंक्तीत जाऊन बसणारा गावसकर, तेंडुलकर, स्टिव्ह वॉ, बॉर्डर, ब्रायन लारानंतर सहावा तर तिसरा भारतीय कसोटीपटू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या चेन्नई कसोटीत द्रविडने मॉर्केलच्या चेंडूवर एक धावा घेऊन हा विक्रम नोंदवला. यासोबतच कारकीर्दीतील कसोटी शतकांचा रौप्यमहोत्सवही त्याने साजरा केला. खेळपट्टीवर नांगर टाकून संथ व संयमी फलंदाजीसाठी ख्यातनाम द्रविडने दहा हजार धावांचा टप्पा मात्र अगदी धडाकेबाज ब्रायन लारापेक्षाही कमी कसोटीत गाठला. एकशे वीस कसोटीत पंचावन्नच्या सरासरीने तो दसहजारी क्लबमध्ये पोहचला आहे.
कसोटीसाठी उपयुक्त तंत्र असलेल्या द्रविडने एकदिवसीय कारकीर्दीतही दहा हजार धावांचा टप्पा गाठून श्रेष्ठत्व सिद्ध केले. तीनशे तेहतीस एकदिवसीय सामन्यात त्याने साडेदहा हजार धावा झळकवून दोन्ही क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवणारा तिसरा क्रिकेटपटू म्हणून बहुमान पटकावला आहे.
1996 मध्ये इंग्लंड दौर्यात लीड्स मैदानावर कसोटी पदार्पणातच 95 धावा झळकवून त्याने प्रतिभेची चुणूक दाखवली होती. मात्र कॉपी 'स्टाइल बुक' फटके खेळणार्या तंत्रशुद्ध द्रविडवर संथ खेळामुळे एकदिवसीय सामन्यात बाहेर बसण्याची वेळ आली होती. बेसिक भक्कम असल्यास दोन्ही क्रिकेटला अनुरूप खेळ करणे अवघड नसल्याचे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणजे द्रविडच.
पदार्पणापासून भारतीय व देशाबाहेर वेगवान व उसळी घेणार्या खेळपट्ट्यांवर द्रविडने खोर्याने धावा जमवल्या आहेत. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या हितास अनुसरून खेळी करणार्या द्रविडचा उल्लेख 'विघ्नहर्ता' म्हणूनही करता येईल. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना तो कित्येकदा मदतीस धावून आला आहे.
कसोटी ड्रा करायची असो किंवा पराभव टाळायचा, त्यावर उत्तर एकच ते म्हणजे द्रविड. द्रविडी प्राणायाम करत गोलंदाजांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात त्याचा हात कोणी पकडू शकणार नाही. डोनाल्ड, मॅकग्राथ पासून ब्रेट ली, डेल स्टेनपर्यंत सर्वंच गोलंदाजांना त्याने नामोहरम केले आहे. स्टिव्ह वॉ सलग सोळा कसोटी विजय नोंदवणार्या विश्वविजयी संघास पराभवाची धूळ चारण्यातही द्रविडचाच हात आहे. कोलकाता कसोटीत फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर भारतीय संघास 'न भूतो ना भविष्यती' विजय मिळवून देणारे महानायक लक्ष्मण व द्रविडच होय. त्यांनी सलग दोन दिवस किल्ला लढवून विजय खेचून आणला होता.
दहा हजारी मनसबदारी मिळवून देऊन भारतीय क्रिकेटची मान सन्मानाने ताठ करणारे तिन्ही क्रिकेटपटू हे मराठी आहेत, हाही योगायोगच. सचिन, गावसकर हे चाळ संस्कृतीत वाढलेले मुंबईकर मराठी तर द्रविड इंदूरमध्ये महाराष्ट्रीयन देशस्थ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेला क्रिकेटपटू. यानंतरची जडणघडण कर्नाटकात झाली तरी त्याने मराठी बाणा सोडला नाही. संसार थाटला तोही नागपूरकर डॉ. विजेते पेंढारकरसोबतच.
शिस्त, नम्रपणाचे मूर्तिमंत रूप असलेला द्रविड जेंटलमॅनच्या खेळात 'भारतीय जेंटलमन' म्हणून शोभून दिसतो. वाद आणि त्याचा अगदी छत्तीसचा आकडा आहे. आकर्षक शैलीत खेचलेल्या कव्हर ड्राइव्ह सारखेच वादही त्याच्यापासून थेट सीमापार पळतात. पर्दापणातला खेळाडू, भारतीय संघाचा कर्णधार ते वरिष्ठ खेळाडूपासून सर्वच भूमिकेत तो 'जेंटलमन' म्हणूनच वावरला. संघाच्या हितासाठी यष्टिरक्षण करण्यापासून सलामीस उतरण्याचा द्राविडी प्राणायाम करावा तो त्यानेच.
'भिंत' या टोपनावाशिवाय त्याचे संघसहकारी त्यास 'जॅमी' नावानेही बोलावतात. त्याचे वडील जॅम बनवणार्या 'किसान' कंपनीत नोकरीवर होते, यामुळे त्यास हे टोपणनाव पडले. द्रविडचे शिक्षण झाले ते बंगळूरमधील सेंट जोसेफ महाविद्यालयात. येथून त्याने कॉमर्समध्ये पदवी घेतली. द्रविडचे व्यक्तिमत्त्व हे बहुसास्कृतिक व बहुभाषिक आहे. कन्नडा, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा तो अस्खलित बोलतो.
राहुल शरद द्रविड हा 'शरदा'च्या चांदण्याप्रमाणेच शांत, संयमी, व सर्वांना हवाहवासा वाटणारा क्रिकेटपटू आहे. म्हणूनच फलंदाजीत आक्रमकेतेपेक्षा भक्कम बचावावर त्याचा अधिक भर असतो. एवढा मोठा भीमपराक्रम गाजवूनही स्वभावातील नम्रपणा तूसभरही कमी झाला नाही. चेन्नईत दहा हजारी पल्ला गाठल्यानंतर त्याने नेहमीच्याच शैलीत बॅट उंचावून प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. जागतिक क्रिकेटविश्वात द्रविडसारखा जेंटलमन क्रिकेटपटू म्हणूनच सर्वांच्या कौतुकाचा धनी ठरतो.
|