हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात हाणल्याच्या घटनेची चौकशी करणारे आयुक्त सुधीर नानावटी यांनी चित्रफीत बघून धक्का बसल्याचे सांगितले आहे. चित्रफितीत जे पाहिले ते धक्कादायक आहे मात्र यामुळे आपले काम सहज झाले.
भविष्यातील चौकशीसाठीही याचा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. इंडियन प्रिमियर लिग स्पर्धेतील मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स दरम्यानच्या सामन्यात पंचवीस एप्रिलला ही घटना घडली होती. नानावटी यांनी येथे आपीएलचे अध्यक्ष ललित मोदी, मंडळाचे सचिव निरंजन शाह व अतिरिक्त सचिव एमपी पांडोव्हे यांच्यासोबत ही चित्रफीत बघितली.
क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी अहवाल सादर करण्यात येईल. नानावटी यांनी सामनाधिकारी फारूख इंजिनिअर यांचे वक्तव्य नोंदवले असून मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचे मतही नोंदवतील. घटनेवेळी राजपूत हरभजनच्या बाजूस उभे होते, असा आरोप आहे. त्यांनी पंच अमिश साहेबा यांच्याशीही बातचीत केली आहे.
साहेबा यांनी मुलाखतीत श्रीशंतच्या व्यवहारावर ताशेरे ओढल्यानंतर त्यांना एका सामन्यासाठी निष्कासित करण्यात आले होते. नानावटी रविवारपर्यंत चौकशी पूर्ण करून सोमवारी क्रिकेट मंडळास अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
|