वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सत्तर लाखांची दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर टोरोंटोतील ट्वेंटी करंडकासाठीच्या प्रशिक्षण शिबिरातून त्यास डच्चू देण्यात आला आहे.
चॅम्पियन्स करंडकासाठी त्याचा संभावित तीस खेळाडूत समावेश करण्यात आला असला तरी शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या चोवीस खेळाडूत त्याचे नाव नव्हते. प्रशिक्षण शिबीर एकवीस जुलैपासून घेण्यात येईल.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष शलाहुद्दीन अहमद यांनी शोएबसाठी मार्ग बंद झाले नसून मंडळाने परवानगी दिल्यानंतर त्याचा विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले. कायदा सल्लागारांनी शोएबकडून दंड वसुलीचा सल्ला दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
शोएबने अठरा महिन्यांच्या बंदीविरूद्ध उच्च न्यायालयात न्याय मागितल्यानंतर बंदी रद्द करण्यात आली मात्र, दंडाच्या रकमेबाबत मंडळानेच निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. पाककडून खेळण्यासाठी त्याने दंडाची रक्कम भरणे आवश्यक असल्याची भूमिका मंडळाची आहे. क्रिकेट मंडळाकडून परवानगी प्राप्त झाल्यास त्यास परत बोलावणार असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले आहे.
|