भारत व श्रीलंकेदरम्यान आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीवर आज पावसाचे पाणी पडले. त्यामुळे दोन सत्र वाया गेली. नाणेफेकीनंतर ४२ षटकांचा खेळ होणे अपेक्षित होते. पण फक्त २२ षटकांचाच खेळ होऊ शकला. श्रीलंकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा बनविल्या आहेत. त्यात सलामीवीर मलिंदा वर्णपुराचे नाबाद अर्धशतक आहे.
अपुरा प्रकाश असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ लवकर आटोपता घेण्यात आला. खेळ संपला तेव्हा वर्णपुराने सहा चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या होत्या. कर्णधार महेला जयवर्धने १६ धावांवर खेळत आहे.
श्रीलंकेच्या दोन्ही विकेट्स भारताच्या वेगवान गोलंदाजांनाच मिळाल्या. इशांत शर्माने सलामीवीर मायकल वेंडर्टला विकेटकिपर दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. वेंडर्ट फक्त तीन धावा बनवू शकला. श्रीलंकेच्या त्यावेळी अवघ्या सात धावा झाल्या होत्या. त्यानंतर अनुभवी झहीर खानने कुमार संगकाराला राहूल द्रविडकडे झेल देण्यास भाग पाडले. संगकाराने फक्त १२ धावा केल्या. श्रीलंकेच्या त्यावेळी ५७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर वर्णपुरा व जयवर्धने यांनी ८५ धावापर्यंत मजल गाठली.
|