वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर असलेला सर्वाधिक कसोटी धावांचा विश्वविक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरवर अधिक दबाव असल्याची चर्चा आहे.
मात्र, सचिनवर अशा प्रकारचा कोणताही दबाव नसून तो विक्रमासाठी खेळत नसल्याचे बालमित्र व माजी क्रिकेटर विनोद कांबळीने स्पष्ट केले.
आपले संपूर्ण जिवन क्रिकेटला वाहून घेतले असल्यामुळे त्याच्याकडून आपोआप विक्रम घडतात. याचा तो कधीही विचार करत नसून लहानपणापासून त्याचा स्वभाव असाच असल्याचे कांबळीने मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले.
शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत दोघांनीही बरोबरच शालेय शिक्षण घेतलेल्या विनोद कांबळीनेही रमाकांत आचरेकरांकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत. त्याने सचिनबरोबर एकदा शालेय क्रिकेट सामन्यात नाबाद 664 धावांची भागिदारी करून विक्रम केला होता.
लहानपणी सचिनने शतक पूर्ण केल्यावर मी त्याच्या आवडीचा 'वडापाव' त्याला खाऊ घालत असे, ही परंपरा अनेक दिवस चालू होती. आता तो 12000 हजार धावा पूर्ण करणार असून मी त्याला बारा हजार वडापाव पाठवू शकत नाही. पण, मुंबईत आल्यावर शिवाजी पार्कवर वडापाव नक्की खाऊ घालणार असल्याचे कांबळीने सांगितले.
लाराचा विक्रम मोडण्यासाठी केवळ 15 धावांनी दूर असलेला सचिन मोहालीतील दुसर्या कसोटीत हा विक्रम मोडील, अशा शुभेच्छा त्याने सचिनला दिल्या. |