हैदराबादमधील पाचव्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे गुवाहाटीत होणार्या सामन्यात धावांचा पाऊस पडणार आहे. दर्शकांना चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यास मिळेल, असा विश्वास आसाम क्रिकेट संघाचे मुख्य क्यूरेटर सुनील बरुआ यांनी व्यक्त केला आहे.
हैदराबादमधील पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 350 धावांचा डोंगर उभा केला होता. भारतही या डोंगराचा जवळ पोहचून केवळ तीन धावांनी पराभूत झाला होता. आता रविवारी गुवाहाटीतील नेहरु स्टेडियममध्ये होणार्या सामन्यात धावांचा पाऊस पडणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. त्यावर 300 पेक्षा जास्त धावा सहज उभारता येतील, असे मत सुनील बरुआ यांनी व्यक्त केले.
खेळपट्टी फिरकी किंवा वेगवान यापैकी कोणाला साथ देईल, हे सांगण्यास श्री.बरुआ यांनी नकार दिला. ते म्हणाले,' कोणताही निष्कर्ष मला काढायचा नाही. परंतु या मैदानावर रोमहर्षक सामना होईल, याची मला खात्री आहे.गोवाहटीत सुर्यास्त लवकर होत असल्याने सामना सकाळी 8.30 वाजात सुरु होऊन दुपारी 4.10 वाजता संपेल.'