जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी देवासारखा पूज्य असलेला आणि त्याच्या सोबत खेळण्याची संधी मिळणे आपले अहोभाग्य समजणा-या क्रिकेटर्सच्या दुनियेत इंग्लंड क्रिकेटमध्ये असाही एक खेळाडू आहे. ज्याच्यासाठी सचिन तेंडुलकरचा सामना करणे 'अनलकी' ठरले असून तेव्हापासून त्याच्यासाठी संघाचे दरवाजेही बंद झाले आहेत.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून एकेकाळी आपल्या फिरकीने भल्याभल्यांची दांडी उडविणारा भारतीय वंशाचा ब्रिटीश खेळाडू मॉंटी पनेसर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गोलंदाजी केल्याचा वर्षभरापूर्वीचा प्रसंग तो आजही विसरू शकत नाही.
मॉन्टीच्या म्हणण्यानुसार वर्षभरापूर्वी चेन्नई कसोटीत सचिनला गोलंदाजी केल्यापासूनच त्याला संघात पुन्हा स्थान मिळालेले नाही. चेन्नईत 11 ते 15 डिसेंबर, 2008 दरम्यान खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लैंड कसोटी सामन्याच्या दूस-या डावात सचिनने धमाकेदार 103 धावांची नाबाद खेळी केली. त्या सामन्यात भारताने इंग्लंडचा सहा गड्यांनी पराभव केला. याच सामन्यातील दुस-या डावात पनेसरने 27 षटकात 105 धावा देऊनही एकही बळी मिळवला नाही.