सचिन तेंडुलकरने मोहालीत ब्रायन लाराचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. बारा हजारी मनसबदार बनलेला सचिन जगातील एकमेव फलंदाज आहे. वन डे आणि कसोटी दोन्ही प्रकारात सर्वोच्च धावसंख्या आज त्याच्या नावे आहे. शिवाय सर्वाधिक कसोटी व वन डे शतकांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. भारताच्या अनेक विजयांत सचिनचे योगदान मोलाचे आहे. असे असले तरी सचिन विक्रमासाठीच खेळतो, अशीही टीका त्याच्यावर होते. अनेकदा गरजेच्या वेळी सचिन खेळला नाही, अशी उदाहरणे सचिनचे विरोधक देत असतात. अर्थात, मी विक्रमासाठी खेळत नाही, असे अनेकदा सचिननेच म्हटले आहे. भारताचा हा महान फलंदाज गेल्या काही दिवसापासून मात्र आपला सूर हरवलेला आहे. श्रीलंकेच्या मालिकेत तर तो साफ अपयशी ठरला होता. मोहालीत आज झालेला विक्रम श्रीलंकेतच होईल की काय अशी अपेक्षा होती. मात्र, सचिनला फॉर्मच न सापडल्याने हा 'लांबलेला' विक्रम मोहालीत अखेर पूर्ण झाला. विक्रमाच्या टेन्शनमुळेच तो उशीरा झाला अशी टीका त्याचे चाहते करतात. सर्वाधिक वेळा नव्वदीत बाद होण्याचा 'विक्रमही' सचिनच्या नावावर आहे. शतक ठोकण्यावेळी येणार्या टेन्शमुळे तो बाद होत असल्याचे त्याचे विरोधक म्हणतात. असे असले तरी सचिन आज जगातील महान फलंदाज आहे हे नक्की. |
|