गेल्या महिन्यात अझलन शहा हॉकी स्पर्धेत झालेला भारत विरूद्ध मलेशिया दरम्यानचा सामना 'फिक्स' होता असा आरोप मलेशियन हॉकी फेडरेशनने केला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही याची दखल घेतली आहे.
येथेच गेल्या १७ मेस झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने मलेशियाला २-१ असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत मात्र भारताला अर्जेंटिनाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, तत्पूर्वीच मलेशियाविरूद्धचा सामना 'फिक्स' होता असा आरोप एका मलेशियन टॅब्लॉईड दैनिकाने केला. त्यानंतर मलेशियन हॉकी फेडरेशननने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. अनेक मलेशियन खेळाडू या सामन्यासाठी 'फिक्स' झाले होते, असे या दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मलेशियन हॉकी संघटनेनेही स्वतंत्रपणे या आरोपांचा तपास सुरू केला आहे.
भारताने मात्र हा प्रकार पूर्णतः फेटाळला आहे. 'मॅच फिक्सिंग'मध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग नाही असे स्पष्ट करताना निवड समितीचे अध्यक्ष अस्लम शेर खान यांनी असे काही आहे, याची शंकाही कधी आलेली नाही, असे सांगितले. भारतीय खेळाडू कोणत्याही फिक्सिंगमध्ये सहभागी नाहीत. मलेशियन खेळाडू सहभागी असतील, तर आम्ही त्याचा दबाव घेण्याची काहीच गरज नाही, असेही ते म्हणाले.
|