नवी दिल्ली, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 21:07 IST )
व्हर्जिनियामध्ये सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतर भारताच्या सोमदेव देववर्मनने दक्षिण आफ्रिकेच्या इझाक वॅन डर मर्व याच्यावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सोमदेवने 6-2, 1-6, 6-2 असा संघर्षपूर्ण विजय मर्ववर मिळविला. जागतिक क्रमवारीत सोमदेव 116 व्या, तर मर्व 264 व्या क्रमांकावर आहे.
सोमदेव आणि मर्व यापूर्वी दोन वेळा आमनेसामने आले होते. या दोन्ही लढती सोमदेवने जिंकल्या होत्या. पहिल्या सेटमध्ये सोमदेवने मर्वला फारशी प्रतिकाराची संधी दिली नाही. मात्र दुसरा सेट मर्वने जिंकत सामन्यात रंगत आणली. निर्णायक सेटमध्ये मर्वने चांगली सुरवात केली होती. परंतु सोमदेवने आपले कौशल्य पणाला लावत तिसरा सेट जिंकून सामना जिंकला. सोमदेवची आता हॉलंडच्या मॅट्वे मिडलकूपशी लढत होईल.