बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (15:54 IST)

#HerChoice सॉरी! पुढचे १० दिवस मी कुणाची बायको नाही, आईही नाही

आपल्या नवऱ्यापासून दूर, संपर्कक्षेत्राच्या बाहेर या स्त्रीला का जावंसं वाटतं? आधुनिक भारतीय स्त्रीच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या सांगणाऱ्या #HerChoice या मालिकेतली नवी गोष्ट.
 
तुम्ही कधी स्पितीला गेला आहात? उत्तराखंडमधली हिमालयाच्या कुशीतली ती दुर्गम जागा आहे. अगदी निवांत आणि मुख्य म्हणजे मोबाईल कनेक्टिव्हिटी नसलेली. याच कारणासाठी मी तिथे गेले.
 
आम्ही दोन तरुण स्त्रिया आणि एक ड्रायव्हर एवढेच होतो त्या ट्रिपमध्ये. अजूनही मला ती ट्रिप आठवते. त्या दिवशी मला खरंच खूप मोकळं वाटलं. अगदी स्वतंत्र असल्यासारखं. गाडीच्या टपावर बसून गार वारा अंगावर झेलत केलेला वळणावळणाचा प्रवास आणि अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकांबरोबर मारलेल्या गप्पा खूप काही देऊन गेल्या.
 
रात्री उशीरापर्यंत नव्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीबरोबर त्याही परक्या पुरुषाबरोबर.. तेही गाडीच्या ड्रायव्हरबरोबर दोन मुलींनी अशा मनसोक्त गप्पा मारणं माझ्यासारख्या तिशीतल्या मध्यमवर्गीय स्त्रीला एरवी अशक्यच. नंतर मोकळेपणा वाढल्यावर तर त्याच्या गाडीत बसून कागदी कपातून चक्क देशी दारूही चाखली आम्ही. धमाल आली. हे सगळं थ्रीलिंग होतंच, पण फक्त थ्रील म्हणून हे केलं का मी? … नाही. त्याहून काही वेगळी, अधिक खोलवर रुतलेली कारणंही आहेत.
 
वर्षातून किमान एकदा आणि जमलं तर दोनदा असं घरापासून- घरच्यांपासून दूर जायचं. नवऱ्यापासून, मुलापासून दूर आठ दिवस राहायचं. मनस्वीपणे हिंडायचं. विसरायचं मी आई आहे, बायको आहे... शक्यतो मोबाईलची रेंज पोचणार नाही, अशा प्रदेशातच फिरायचं हे 10 दिवस... तर खरी मजा!
 
मी आणि नवरा दोघेही मनस्वी कलाकार. त्यातून भटकंतीची आवड कॉमन. त्याच्याबरोबर फिरणं मी एंजॉय करतेच. पण तो सोबत असतो तेव्हा, कुठे जायचं, प्रवासात कुठे थांबायचं, कुठल्या हॉटेलात राहणं सोयीचं, कुठे नाही, कुठे सुरक्षित आहे, कुठे नाही वगैरे तोच ठरवतो. मला विचारत नाही असं नाही, पण बायको ही आपली जबाबदारी असल्याच्या थाटात सगळं सुरू असतं.
 
मलाही ते गैर वाटतं असं नाही. पण कधीकधी अगदी जाणवत राहतं... मनात. हॉटेलमध्ये शिरल्यानंतर रूम चांगली आहे ना, हे बघायला तोच दरवाजा उघडणार, खात्री करणार, मग मी आत शिरणार. मेन्यूकार्ड पहिलं त्याच्या हाती पडणार, अगदी कुलूप लावण्यापासून ते बॅगा उचलण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्याची. जबाबदारी आणि निर्णयही. यात थोडा ब्रेक हवाच ना?
 
मूल झाल्यावर या ब्रेकची प्रकर्षानं जाणीव झाली. कारण मूल झाल्यानंतर माझं बाहेर फिरणं कमी झालं, नवऱ्याचं मात्र कायम होतं. आपणही त्याच्यासारखं मनसोक्त हिंडावं असं ठरवून पहिल्यांदा नवऱ्याशिवाय बाहेर पडले. मुलाला या काळात नवरा सांभाळणार असं ठरलं.
 
तो पहिला प्रवास अनप्लॅण्ड नव्हता खरा. तरीही दर दोन- तीन तासांनी नवऱ्याचा मेसेज यायचा. कुठे पोचलात? ट्रॅफिक आहे का? आत्ता कुठे आहात, हे पाहिलं नाहीत का? त्याच्या हेतूविषयी मला शंका नाही. पण तरीही त्या सारख्या अपडेट्सनी मी हैराण झाले. आपल्यावर सतत कुणीतरी लक्ष ठेवून आहे, ही भावना जाचत राहिली. आपल्याला ट्रॅक केलं जातंय. माझ्या स्वतःच्या प्रवासात, स्वतःसाठीच्या वेळेत व्यत्यय येतोय, हे लक्षात आलं आणि मग शक्यतो मोबाईलची रेंज न येणाऱ्या जागीच जायचं निश्चय केला.
 
#HerChoice ही मालिका आहे १२ भारतीय स्त्रियांच्या आयुष्यांवरील खऱ्याखुऱ्या कहाण्यांची. आधुनिक भारतीय स्त्रीच्या समोरील आव्हानं आणि तिच्या जगण्याचा विस्तारलेला परीघ उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. या कहाण्यांच्या केंद्रस्थानी आहेत, तिच्या जगण्याचा वेध घेणारं तिचं निवड स्वातंत्र्य, आकांक्षा आणि इच्छा.
 
दर काही तासांनी फोन करून मी इथे पोचले, हे खातेय, हे पाहिलं. तुम्ही जेवलात का, चिंटू खेळतोय ना, त्यानं खाल्लं का, किती खाल्लं, काय जेवला हेच सगळं बोलायचं, विचारायचं तर या वेगळ्या प्रवासाच्या प्रयोगाला काही अर्थच नाही.
 
पण पहिल्यांदाच नवऱ्याशिवाय एकटी अशी मैत्रिणीबरोबर मनसोक्त हिंडत होते, तेव्हा दडपण होतंच. 3 वर्षांच्या मुलाला घरी बाबांजवळ सोडून पहिल्यांदा निघाले होते. मुलगा राहील ना माझ्याशिवाय हे टेन्शन होतंच, शिवाय जातोय तर खरं, पण प्रवास व्यवस्थित होईल ना, हॉटेल बरं मिळेल ना वगैरे धाकधुकही होती. पण पहिला प्रवास झकास जुळून आला आणि मग याची सवय झाली. भीड चेपली, आत्मविश्वास मिळाला.
 
या माझ्या बाहेर जाण्याला नवऱ्याचा पाठिंबा आहे आणि त्यानंही माझ्याशिवाय असं वर्षातून किमान आठ दिवस आवर्जून फिरावं याला माझा पाठिंबा आहे. आमच्या घरच्यांचाही! हो… मी जॉइंट फॅमिलीत राहते. द बिग इंडियन जॉइंट फमिली नाही आमची.. तरी नवरा, मुलगा, सासू आणि सासरे. या सगळ्यांनी वर्षातले ते १५ दिवस फक्त माझे हे तत्त्व स्वीकारलंय आता.
 
माझ्या स्वतःसाठीच्या वेळात पुन्हा त्याच त्या सांसारिक गोष्टी मला नको होत्या. मी लग्न झालेली मध्यमवयीन स्त्री आहे, आता ७ वर्षांच्या मुलाची आई आहे, हे खरं. पण हीच आणि एवढीच माझी ओळख नाही ना. सतत त्याच ओळखीचं भान राखत का जगायचं?
 
मुळात लग्न झालं म्हणजे फक्त नवऱ्याबरोबरच प्रवास करायचा असा काही नियम आहे का? माझ्या मुलाच्या शाळेत पालकसभा होती, मी भूतानला गेले होते तेव्हा. माझा नवरा पालकसभेला गेला होता. त्यानंच सांगितलेला हा किस्सा.
 
चिंटूची आई कुठे गेली, असं त्याच्या मित्राच्या आईनं विचारलं.
 
नवरा म्हणाला, 'ती बाहेरगावी गेली आहे.'
 
'अच्छा कामाला गेली आहे का?'
 
'नाही… सहज फिरायला.'
 
'कमाल आहे... एकटीच? तुम्हाला टाकून?'
 
त्यातल्या 'टाकून' शब्दावर नवरा जाम हसला होता आणि त्यानं त्यासाठीच हा किस्सा मला रंगवून सांगितला होता.
 
पण हे ऐकताना मला हीच बाई गेल्या महिन्याच्या पालक सभेच्या वेळी भेटल्याचं आठवलं. तिचा नवरा बाईक टूरवर गेला आहे, हे अभिमानानं सांगत होती. तेव्हा मी कुठे तिला विचारलं होतं - तुम्हाला 'टाकून' गेला का, म्हणून.
 
नवऱ्याशिवाय एकटं फिरायला जाते ते स्वतःच्या आनंदासाठी. उगाच खोटी कारणं कशाला द्यायची दर वेळी? माझ्या सासूला सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटलं असावं. पण त्या काही बोलल्या नाहीत.
 
माझ्या आईला मात्र अजूनही हे पचनी पडत नाही. मी या वेळी तिला न सांगताच बाहेरगावी गेले. रोड ट्रिपला. अशाच काही मित्रांबरोबर आणि तिचा फोन आला.
 
"अगं दोन दिवस झाले फोन करतेय. एक तर लागत नाही आणि लागला तर तू उचलत नाहीस."
 
"मी प्रवासात आहे आई."
 
"पुन्हा? आता काय? कुठे?"
 
"काही नाही... जरा चेंज. रोड ट्रिप."
 
"चिंटू आणि त्याचे बाबा आहेत ना बरोबर?"
 
"नाही. ते घरीच आहेत."
 
"अगं, काय बाई आहेस तू? आत्ताच तर फिरून आलीस. असं कसं सारखं भटकायला जमतं तुला? आई आहेस का कोण? ते पोरगं बिचारं एकटं घरी आहे. काय खातंय, पितंय कुणाला माहिती? अगं या वयात लागते आई जवळ. सारखं काय बाहेर भटकायचं… घरदार सोडून? तुझी सासू सोडते कशी?"
 
"आई, कुणी सोडायला मी बांधून का घ्यायचंय स्वतःला? की दुसऱ्यांनी बांधलं पाहिजे मला?"
 
आई आणि माझ्यात या अर्थाचा संवाद अजूनही प्रत्येक ट्रिपच्या वेळेला थोड्या-अधिक फरकाने असाच घडतो. मी एकटी का फिरते, याची मी दिलेली कारणं तिला पटत नाहीत असं नाही, पण कदाचित लोक काय म्हणतील याची चिंता तिला या कारणांपेक्षा मोठी वाटत असावी.
 
एकटीने प्रवास करताना माझ्यातली मी मला सापडते. मला माझ्या सुरक्षेची काळजी करायची असते. निर्णय आणि जबाबदारी दोन्ही फक्त माझे असतात. नवऱ्याबरोबर किंवा कुटुंबाबरोबर फिरताना आणि एकटी किंवा मैत्रिणींबरोबर फिरताना मी एकसारखी वागते का? माहिती नाही… मी तेव्हा एक वेगळीच स्त्री असते हे नक्की.
 
तो स्पिती व्हॅलीच्या ट्रिपच्या वेळचा आमचा ड्रायव्हर खरंच हँडसम होता. त्याच्याबरोबर बिनधास्त गप्पा मारताना मजा आली. कॉलेजचे दिवस आठवले एकदम. छान मुलं दिसली की कसं उगाच लाजायचो आम्ही. अशा मोकळेपणाने मी नवऱ्याबरोबर असताना वागू शकले असते का? कदाचित हो. कारण आमच्यातलं नातं पारदर्शी आहे. पण तशी वेळ आली नसती हे निश्चित. कारण समोरचा माणूस लग्न झालेल्या बाईशी आणि एकट्या बाईशी एकसारखं थोडीच वागतो!
 
दरवेळी या प्रवासात फार सुंदर अनुभव येतात असं नाही. धनुषकोडी नावाचं नितांत सुंदर गाव आहे दक्षिण भारतात... अगदी टोकाला. खूप सुंदर समुद्रकिनारा आहे. एकेकाळचं आबाद आणि आता उद्ध्वस्त झालेलं गाव आहे ते. किनारा तर अगदी नितळ पण निर्मनुष्य. मी इतर चार जणांच्या ग्रूपबरोबर इथे गेले होते. नवऱ्यानंच सुचवलेली ही ट्रिप.
 
आदल्या वर्षी या किनाऱ्यावर नवरा आणि त्याचा मित्र निवांत झोपल्याचे फोटो पाहिले होते मी. मी ते करायला धजावले नाही. स्त्री म्हणून फिरताना काही बंधनं येतात आणि नवऱ्यावर जळते मी त्या त्या वेळी. म्हणूनच माझ्या जबाबदारीशिवाय त्याने त्याचे ते स्वच्छंदी क्षण 10 दिवसांसाठी जगावेत हे मला प्रकर्षानं वाटतं.
 
आम्ही दोघी जणीच गेलो होतो एका दुसऱ्या ट्रिपला एकदा. तेव्हा तर बरं हॉटेल शोधण्यात काही तास गेले. शिवाय असं मुलींनी एकटं फिरताना थोडं जास्त सजग राहावंच लागतं.
 
ड्रायव्हरनं सिमल्याला एका हॉटेलपाशी सोडताना विचारलं होतं, 'कुछ और इंतजाम लगेगा आपको?' मला तर त्याच्या वाक्याचा अर्थ उमगायलाच किती वेळ लागला...
 
मग मनात आलं, हे असे अनुभव, अशी माणसं, असं जग नवऱ्याबरोबर फिरताना कसं दिसणार? खरं जग बघायला वर्षातून १० दिवस तरी लग्न झालेली स्त्री, बायको, आई हे टॅग उतरवायलाच हवेत.
 
(महाराष्ट्रात राहणाऱ्या एका तरुण स्त्रीची ही खरीखरी कहाणी. तिच्या विनंतीनुसार नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. बीबीसी प्रतिनिधी अरुंधती रानडे जोशी यांनी शब्दांकन केलं आहे. दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. )