शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

ओरछा - किल्ल्यांचे शहर

WD
ओरछा म्हणजे डोंगराच्या कुशीत आणि किल्ल्यांच्या मध्यभागी असलेले. त्याचा आणखी एक अर्थ 'गुप्त स्थान' असाही आहे. झांसीपासून 16 कि. मी. अंतरावर किल्ल्यांचे शहर अर्थात ओरछा वसले आहे. ओरछा ही एके काळी बुंदेलखंडची राजधानी होती. येथे चारही बाजूंना गुंजणारे सुमधुर संगीत पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. येथील किल्ले आजही जिवंत वाटतात. या किल्ल्यामध्ये राजाचा दरबार भरला आहे, असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

अर्थात राजेशाही संपल्याने किल्ल्यांच्या माध्यमातून केवळ त्यांच्या स्मृती राहिलेल्या आहेत. येथील प्राचीन किल्ल्यांचे रूपांतर आता पर्यटन स्थळांमध्ये झाले आहे. मात्र किल्ले न्याहाळत असताना त्या काळातील राजांची माहिती घेणे आवश्यक आहे. ओरछाचे किल्ले पुरातन आहेत आणि इथला समृद्ध वारसाही या दगडांमध्ये कैद आहे.

देश-परदेशातील पर्यटक येथे वास्तुकलेचे अद्‍भूत दर्शन घेण्यासाठी येतात. बुंदेलखंडातील महाल, किल्ले, पवित्र व भव्य मंदिरे तसेच नैसर्गिक सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे पहाणे ही पर्वणीच आहे. येथील पुरातन किल्ले पाहिल्यानंतर शहर किती प्राचीन आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. बुंदेलखंडचे नक्षीदार प्रवेशद्वार पर्यटकांचे लक्ष आकर्षित करते. 18 व्या शतकात तयार झालेला शीश महाल आज 'हेरीटेज हॉटेल' या नावाने ओळखला जातो.

महालाशिवाय येथील भव्य हवेल्या पाहून पर्यटक थक्क होतात. दाऊजीची हवेली ही येथील प्रमुख हवेली आहे. येथील मंदिरांमध्ये चतुर्भुज मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर खूप प्रसिद्ध आहे. लक्ष्मीनारायण मंदिरावर करण्यात आलेल्या नक्षीकाम व कलाकृतीद्वारे ओरछा शैली दिसून येते. बेतवा नदीवर असलेली ओरछाची छत्रीही देखणी आहे. प्राचीन किल्ल्यांचे रूपांतर आता अनेक पर्यटन स्थळांमध्ये झाले आहे. मात्र किल्ले निहाळत असताना त्या काळातील राजांची माहिती घेणे आवश्यक आहे. मात्र ओरछाचे किल्ले इतके पुरातन आहेत की, ओरछाची विरासत येथील दगडांमध्ये कैद आहे.

चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनातील शेवटचा काळ येथे गेला आहे. त्यांचे स्मारक येथे आहे. येथील बाजारात 'डोकरा' या धातूच्या आकर्षक ओतीव मूर्ती तसेच अनेक कलाप्रकार विक्रीसाठी उपलब्ध असतात.

येथील बेतवा नदीकाठी असलेल्या कंचन घाटावरील चौदा छत्र्या ओरछातील राजामहाराजांची आठवण करून देतात. प्राचीन काळी स्मृतिप्रित्यर्थ छत्री उभारण्याची प्रथा होती.

कसे पोहचाल?
हवाई मार्ग- ओरछा येथून सगळ्यात जवळचे विमानतळ ग्वाल्हेर व खजुराहो येथे आहे.

रेल्वे मार्ग- ओरछा येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक झांसी येते आहे. दिल्ली- मुंबई, दिल्ली- चेन्नई या मुख्य रेल्वे मार्गावर झांसी हे मोठे रेल्वे स्थानक आहे.

महामार्ग- झांसी, खजुराहो, दिल्ली, ग्वाल्हेर, आग्रा, भोपाळ येथून ओरछासाठी बस तसेच खाजगी वाहन सहज उपलब्ध होत असते.