शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

कामरूपचा कुंभ- अंबुवासी यात्रा

NDND
तंत्र-मंत्र व साधनेसाठी जगविख्यात असलेल्या कामरूप कामाख्या (गुवाहाटी) येथील आदिशक्ति कामाख्या देवीच्या मंदिरात प्रतिवर्षी मोठी यात्रा भरते. तिलाच 'अंबुवासी' यात्रा असे संबोधले जाते. यात सहभागी होण्यासाठी येथे देशातील कानाकोपर्‍यातून साधू व मांत्रिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. शिवाय चार ते पाच लाख भाविक हजेरी लावतात.

'आदीशक्तीचे दास' येथे असलेल्या नीलाचल पर्वतातील विविध गुहांमध्ये बसून कामाख्या देवीची तल्ली‍न होऊन तपश्चर्या करत असतात. अंबुवासी यात्रेदरम्यान येथे चित्रविचित्र वेशभूषेतील हटयोगीही दिसतात. त्यांच्या चित्रविचित्र हरकती पाहून भाविक थक्क होतात. कोणी आपल्या दहा ते बारा फुटांच्या जटा सावरत असतो, तर कोणी पाण्यात बसून तर कोणी एक पायावर उभे राहून तपश्चर्या करताना दृष्टीस पडत असतात.

भारतीय संस्कृत्तीत महिलांच्या रजोवृत्तीच्या काळात शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळेच यात्रेदरम्यान आसाम राज्यात शुभ कार्य केले जात नाही. विधवा तसेच साधु-संत अग्नीला शिवत नाही. तसेच अग्निवर शिजलेले भोजन खात नाही. चार दिवसांचा यात्रोत्सव आटोपल्यानंतर भाविक आदीशक्ती कामाख्या देवीला अर्पण केलेल्या लाल कपड्याचे तुकडे मिळवण्यासाठी आसुसलेले असतात.

भगवान विष्णुच्या चक्राने सतीच्या योनीचे झालेले तुकडे येथील नीलाचल पर्वतावर पडले होते. अशी आख्यायिका असून देवीच्या एक्कावन्न शक्तिपीठामध्ये कामाख्या महापीठला सर्वश्रेष्ठ मानले जाते. याच आख्यायिकेनुसार येथील कामाख्या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते. यासाठी यात्रेच्या चार दिवसापैकी आधीचे ‍तीन दिवस मंदिर बंद असते. चौथ्या दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. कामाख्या देवाचे मोठे महत्व असल्याने भाविक येथे भक्तिभावनेने येत असतात.
NDND


रतिपती कामदेव शिवशंकराच्या क्रोधाग्निमध्ये भस्म झाले होते. कामदेवाने येथेच आपले पूर्वरूपही प्राप्त केले होते. त्यामुळे कामाख्या देवीच्या यात्रोत्सवाला कामरूप कुंभ असे नाव पडले आहे. असा उल्लेख कल्की पुराणात आला आहे.

कामाख्या धाम एक पर्यटन स्थळ :
कामाख्या मंदिराचा परिसर नैसर्गिक सौंदर्यने ओतप्रोत भरलेला असून पर्यटन स्थळ म्हणून विख्यात आहे. देश-विदेशतील पर्यटक येथे मोठ्य संख्येने हजेरी लावत असतात. ब्रह्मपुत्रा नदी नीलाचल पर्वताला लागून वाहत असल्याने अनोख्या सौंदर्याने नीलाचल पर्वत नटलेला आहे.

पर्वतावर उमानंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात विराजमान असलेले शिवशंकर कामाख्या देवीचे पती आहेत. त्यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक उमानंदेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय परतीच्या प्रवासाला प्रारंभ करत नाही. हे मंदिर काळया पाषाणापासून तयार करण्यात आले आहे. नीमाचल पर्वत हा भूकंप प्रभावित क्षेत्रात येत असल्याने मंदिराचा गाभारा दहा ते बारा फुट जम‍िनीत आहे. गाभार्‍यात जाण्यासाठी जिना आहे.

नीलाचल पर्वतावर एक मोठा तलाव आहे. पर्वतावर विविध मंदिरे आहेत. शिखरावर भुवनेश्वरी देवीचे मंदीर असून तेथून संपूर्ण गुवाहाटी शहर पहाता येते. भाविक तसेच पर्यटकांसाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध असते. पायी जाणार्‍या भाविकांना निसर्गरम्य परिसरातून पायवाटही आहे.
टीप- यंदा कामख्या देवीचा 'अंबुवासी यात्रोत्सव' 22 जून ते 25 जून दरम्यान आहे.