शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

बेट अंदमान

WD
भारताला जोडलेला नसून भारताचाच एक भाग म्हणजे बेट अंदमान. सहलीला गेल्यावर अवश्य पाहावा असा हा द्वीपसमूह आहे. बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे.

इतिहासकाळात ‘काळेपाणी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंदमानचा आनंद अवश्य घ्यायला हवा. आज भारतीयांसाठी अंदमान हे एक निसर्गरम्य र्पटनस्थळ आहे. याला राष्ट्रीय तीर्थ असेही म्हणतात. कारण या बेटांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेला आहे. इथला तुरूंग विशेष प्रसिद्ध आहे. या तुरूंगाची मूळ रचना अशी आहे की, याला चक्राच्या आर्‍याप्रमाणे सात विभाग असून त्यांच्या मध्यभागी एक उंच कॅट टॉवर आहे. हा तुरूंग तीन मजली होता. बहुसंख्य लोकांना या तुरूंगाबद्दल मोठे आकर्षण वाटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ठेवण्यात आले होते.

WD
सावरकरांनी कोलू पिसून आणि काथ्या कुटून आपल्या दोन जन्मठेपा येथे भोगल्या. असह्य यमयातना सोसतानाही कोणत्याही साधनांची मदत नसताना या भयानक कोठडीत काव्यरचना केल्या. अंदमानच्या अनुपम निसर्गसौंदर्याचे वर्णन घडते ते हॅवलॉक आयलंडवर निळ्या हिरव्या रंगाची चमक दर्शविणारे समुद्राचे पाणी, पांढर्‍या शुभ्र किनार्‍याला लाभलेली नारळांच्या झाडांची महिरप, समुद्रावरुन येणारा सुखद वारा यामुळे या बेटाला भेट दिल्यानंतर नंदनवनात आल्यासारखे वाटते.

अंदमानवरील सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क’ मध्ये या सुविधा आहेत. जवळच ‘जॅली बॉय’ हे बेट येते. या बेटावर आपल्याला अनेक वॉटर स्पोर्टसची मजा लुटता येते.

ग्लास बॉटम बोटीतून जलसफर करून सागरातील कोरल्सची अनोखी दुनिया पाहता येते. याशिवाय ‘पोर्ट ब्लेअर’ मधील प्रथम सॉ मिल, रॉस आयलंड, वायपर ऑयलंड इत्यादी ठिकाणे अंदमान बेटापासून फारशी दूर नसल्याने कमी त्रासामध्ये पाहता येतात.