शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2015 (11:53 IST)

भारताच पूर्वेकडील खरेदी

पर्यटन करताना शॉपिंग करणे आवश्क असते. कुठे काय मिळते याची माहितीही तितकीच महत्त्वाची असते. भारतातील पूर्वेकडील राज्ये   म्हणजे ओरिसा, आसाम, मणिपूर, नागालँड ही पर्यटकांच्या दृष्टीने उपेक्षित आहेत. पण या राज्यातील वस्तू क्वचितच इतर राज्यात बघायला मिळतात. 
 
आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा इत्यादी टेकडय़ांच्या प्रदेशात वाढणार्‍या जंगलातील वेली आणि गवत यांच्या साहायने बनवलेली पादत्राणे, काथचे गालिचे, चटया, वॉल हँगिंग इ. आजूबाजूच्या परिसरातील झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी इतदींच्या डिझाइन्सनी सजलेले असतात. 
 
नागा लोक विविध आकारांच्या टोपल्या, हॅट आणि मोठमोठय़ा छत्र बनवण्यात प्रवीण आहेत. आसाममधील मुगा रेशमापासून बनवलेल्या, छोटीशी बॉर्डर असलेल्या, पशुपक्ष्यांचे डिझाइन असलेल्या आणि डोळ्याला सुखद वाटणार्‍या रंगात बनवलेल्या मणिपुरी साडय़ा आणि शाली अगदी विलोभनीय असतात. 
 
ओरिसा राज्य चांदीवरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. चांदीवर अगदी बारीक कोरीव कामाला फिलीग्री वर्क म्हणतात. कोरीव काम केलेल्या चांदीच्या डब्या, अत्तरदाण, गुलाबदाण, वाटय़ा, चांदीचा रथ, मोर, पेपरवेट इत्यादी वस्तू तसेच कर्णफुले, नेकलेस, ब्रुचेस, पदके, पैंजण इतदी दागिने पाहिल्यावर तेथील कलाकुसर लक्षात येते. 
 
कोलकात्याच्या तलम, सुती साडय़ा, सोनेरी किनार लाभलेल्या तंगेल साडय़ा, सांदीपूरच्या चंदेरी किनारीच्या सुती साडय़ा इत्यादी साडय़ांची विविधता इतर राज्यात बघायला मिळत नाही. 
 
ब्रह्मपुत्रा, गंगा या नद्यांच्या किनार्‍यावरील झाडांपासून बनवलेल्या बाहुलीचे मुखवटे असलेल्या फुलदाण, विविध वेशातल्या रंगीबेरंगी बाहुल्या, निरनिराळ्या आकारातील दिवे, कुंडय़ा इत्यादी फार पूर्वीपासून तयार केले जातात. दार्जिलिंगला तिबेटी पद्धतीने विणलेले रग, अतिशय स्वस्तात मिळणारे आणि टाचेला रस्सीचा वापर करून बनवलेले बूट इतरत्र कुठेच दिसत नाहीत. 
 
भारताच्या पूर्वेकडील प्रदेशात गेल्यास अशी विविध प्रकारची खरेदी करायला हरकत नाही. पर्यटकांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा.  
 म.अ. खाडिलकर